नोटबंदी, जीएसटीने सामान्यांचे कंबरडे मोडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असून त्यानिमित्त पाटोदा येथे बुधवारी (ता.१७)  जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. 

पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असून त्यानिमित्त पाटोदा येथे बुधवारी (ता.१७)  जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. 

 या वेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार रामराव वडकुते, आमदार राजेश टोपे, आमदार जीवनराव गोरे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, युवकचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍य पाटील, संग्राम कोते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. 

   पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारने राज्यातील जनतेला विकासाचे केवळ गाजर दाखविले आहे. मुख्यमंत्री कर्जमाफीचे आकडे दाखवतात; मात्र येथे कोणाला कर्जमाफी मिळाली आहे का? कर्जमाफी मिळाली नसेल तर हे पैसे गेले कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या परिसरातील शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे जिल्हा बॅंकेत असून शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठीदेखील हे पैसे दिले जात नाहीत,  अशाप्रकारे जिल्हा बॅंका चालवल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ चालू करण्यात आले आहे, त्यामधून अद्याप एकही रुपया या कामगारांच्या मुलांसाठी दिला गेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या राज्यातील, तसेच केंद्रातील आमदार, खासदार सरकारच्या धोरणांवर नाराज आहेत. या सरकारच्या काळात मागील तीन वर्षांत बीड जिल्ह्यात एकही नवीन उद्योग व कारखाना आलेला नसल्याचेही ते म्हणाले. हे सरकार उलथवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सरकार फसव्या जाहिरातबाजीने सत्तेत आले आहे. या साडेतीन वर्षांत कोणाच्याही आयुष्यात अच्छे दिन आलेले नाहीत, या सरकारच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणांमुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून हे सरकार आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्र गर्जे यांनी प्रास्ताविक केले. विजयसिंग बांगर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

धसांवर नामोल्लेख टाळत निशाणा 
या वेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश धस यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी माणसे आम्ही जोडली आहेत, मात्र ही पिल्लावळ कोठून आली असा प्रश्न आता पडत आहे. धनंजय मुंडे यांनीही ज्यांना कुठेच चव राहिली नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावे असा टोला लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news ajit pawar NCP