फसवणूक करून परस्पर विकले तब्बल तेरा ट्रॅक्‍टर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कन्नड - तालुक्‍यात ट्रॅक्‍टर चोरांचे मोठे रॅकेट औरंगाबाद ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उघडकीस आणले असून, दोन ट्रॅक्‍टरसह एका चोरट्यास पकडण्यात यश आले आहे. 

कन्नड - तालुक्‍यात ट्रॅक्‍टर चोरांचे मोठे रॅकेट औरंगाबाद ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उघडकीस आणले असून, दोन ट्रॅक्‍टरसह एका चोरट्यास पकडण्यात यश आले आहे. 

आंबा तांडा (ता. कन्नड) येथील फिर्यादी बळीराम राठोड यांनी सात महिन्यांपूर्वी स्वराज कंपनीचे सहा लाख पासष्ट हजार रुपयांचे विना पासिंग ट्रॅक्‍टर खरेदी केले होते. विटांचा व्यवसाय करणाऱ्या श्री. राठोड यांच्याकडे शेख शब्बीर (रा. श्रीराम कॉलनी, कन्नड), त्यांचा मुलगा शेख शकील हे दोघे कामावर होते. शेख शकील याने ओळखीचा फायदा घेत त्याचे दोन मित्र सरदारसिंग राजपूत, रा. पांगरा (ता. कन्नड), शेख नासेर शेख रसूल (रा. मोमीनपुरा, कन्नड) यांच्याशी वाळू वाहतुकीसाठी दरमहा पंधरा हजार रुपयांप्रमाणे ट्रॅक्‍टरचे भाडे ठरविले. ट्रॅक्‍टर, चालक आणि ट्रॉली आम्ही ठेवू, असे शेख शकील याने सांगून ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले. त्यानंतर शेख शकील, देविलाल राजपूत यांच्या मध्यस्थीने श्री. राठोड यांनी त्यांच्या ओळखीच्या केशरचंद कपूरचंद राठोड, विनोद गोरख चव्हाण, कृष्णा फतू राठोड, गणपत हंसराज राठोड, देविदास हिरा राठोड, तुळशीराम देवराव पवार, अशोक लकीचंद राठोड, अरुण दासू पवार, शंकर हिरा चव्हाण, उत्तम आनंदा आडे, दिनेश महारू चव्हाण, शेख शमीम यांचेही ट्रॅक्‍टर दहा ते पंधरा हजार रुपयांनी भाड्याने घेतले. सुरवातीस दहा ते पंधरा हजार रुपये दिले. मात्र, नंतर शेख शकील शब्बीर यांच्याशी संपर्क साधला असता पैसे द्या किंवा ट्रॅक्‍टर परत द्या, असा तगादा लावला. प्रत्यक्षात त्याने पैसेही दिले नाहीत आणि ट्रॅक्‍टरही परत केले नाही. नंतर माहिती घेतली असता त्यांनी ट्रॅक्‍टर परस्पर मध्य प्रदेश, गुजरात, धुळे, शिरपूर, चाळीसगाव येथे विकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बळिराम साहेबराव राठोड यांनी कन्नड पोलिसांत तक्रार नोंदविली. शेख शब्बीर, शेख शकील व देविलाल राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चोरीच्या 13 पैकी दोन ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहेत. संशयित आरोपी देविलाल राजपूत (रा. पांगरा, ता.कन्नड) यास गुरुवारी (ता. 26) अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रोहित बेंबरे हे करीत आहेत. 

Web Title: marathwada news crime police