पन्नास ग्रामपंचायतींची होणार वर्षाअखेरीस निवडणूक

पन्नास ग्रामपंचायतींची होणार वर्षाअखेरीस निवडणूक

पाटोदा - चालू वर्षाअखेरीस तालुक्‍यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. गावपातळीवर आपली राजकीय पकड मजबूत करण्यासाठी अनेक दिग्गज नेते आपली ताकद लावत आहेत. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे अनेक दिग्गज नेते यामध्ये लक्ष घालण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या वेळी निवडणुकांचे वेगळेच चित्र पाहायला मिळू शकते. 

या वर्षअखेरीस म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतींची, तर जानेवारी २०१८ मध्ये १६ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ठिकाणी लगेच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामध्ये येवलवाडी, पिठ्ठी, महासांगवी, गवळवाडी, निवडुंगा, तळेपिंपळगाव, डोमरी, थेरला, भायाळा, अमळनेर, चिंचोली, बेनसूर, कुसळब, सौताडा, कोतन, करंजवन, डोंगरकिन्ही, लांबरवाडी, पांढरवाडी, पिंपळवंडी, पाचंग्री, कारेगाव, नाळवंडी, नफरवाडी, अंतापूर, पाचेगाव, येवलवाडी (पा.), सावरगाव घाट, कारेगाव आदींसह काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

या सर्व गावांची मिळून एकूण लोकसंख्या ६९ हजार ३६१ आहे. जानेवारीमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये गांधनवाडी, वाहली, सुप्पा, चुंभळी, उंबरविहिरा, धसपिंपळगाव, तांबा राजुरी, मंजरीघाट, वैद्यकिन्हीसह अन्य गावांचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींची मिळून एकूण २४ हजार ९१२ एवढी लोकसंख्या आहे. सद्यःस्थितीत तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे रिमोट कंट्रोल सुरेश धस यांच्या हातात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून धस यांच्या भाजप प्रवेशाच्या तारखेबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम असला, तरी हा प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. 

दरम्यान, जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्या समर्थकांची वर्णी लावून धस यांचा गावपातळीवरील राजकारणात आपली ताकद सिद्ध करून पक्षात आपले स्थान मजबूत बनविण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. आमदार भीमराव धोंडे यांच्यासाठीही या निवडणुका पक्षातील प्रतिष्ठा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. राष्ट्रवादीसाठीही नव्याने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी चांगली संधी राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com