‘औषधी तुटवडा’ आजार अधिकच जर्जर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

बीड - तजेल चेहरा, चांगले कपडे, अंगपिंडाने चांगला असलेला एखादा माणूस आतून मोठ्या रोगाने जर्जर झालेला असतो तसाच काहीसा प्रकार जिल्हा रुग्णालयाचा झाला आहे. विविध आरोग्य उपक्रमांत वरच्या स्थानावर असलेल्या जिल्हा रुग्णालयाला बारमाही असलेला औषधी तुटवड्याचा आजार वरचेवर अधिकच जर्जर झाला आहे. 

बीड - तजेल चेहरा, चांगले कपडे, अंगपिंडाने चांगला असलेला एखादा माणूस आतून मोठ्या रोगाने जर्जर झालेला असतो तसाच काहीसा प्रकार जिल्हा रुग्णालयाचा झाला आहे. विविध आरोग्य उपक्रमांत वरच्या स्थानावर असलेल्या जिल्हा रुग्णालयाला बारमाही असलेला औषधी तुटवड्याचा आजार वरचेवर अधिकच जर्जर झाला आहे. 

अगदी ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना देण्यासाठी अनेक प्रथमोपचाराच्या औषधींपासून अपघात (कॅज्युअलिटी) कक्षात येणाऱ्या अपघाती व विषबाधा रुग्णांच्या औषधींचाही तुटवडा वरचेवर वाढत आहे. विशेष म्हणजे नुकताच राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहात जंतनाशक गोळ्या शस्त्रक्रियांचा आकडा, प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा योजना अशा शासनाच्या उपक्रमांत जिल्हा रुग्णालय नेहमीच अव्वल असते; पण जिल्हा रुग्णालयाचे असे बाहेरून ‘सुदृढ रूप’ दिसत असले, तरी आतून औषधी तुटवड्याचा आजार अधिकच जर्जर होत असल्याचे वास्तव आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने केवळ कॅज्युअलिटी आणि ओपीडीमधील औषधींची माहिती घेतल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. ‘अंगणच सांगते घराची कळा’ या उक्तीप्रमाणे वॉर्डांमध्ये काय स्थिती असेल, हे कोणाच्याही लक्षात येईल. 

बालकांच्या जंतनाशक, अत्यावश्‍यक औषधींचाही तुटवडा
मागच्याच महिन्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सर्वत्र बालकांना जंतनाशक गोळ्या वाटपाचा राष्ट्रीय कार्यक्रम झाला; मात्र जिल्हा रुग्णालयात याच गोळ्या नाहीत, हे विशेष. लहान बाळांसाठी केवळ तापाचे औषध सोडले तर जुलाब, पोटदुखीची औषधी नाही. तापामध्ये बालकांना झटका आल्यानंतर उपचार म्हणून आवश्‍यक असणाऱ्या गोळ्यांचाही येथे तुटवडा झाला आहे. अत्यवस्थ, हृदयविकार व डोक्‍याला मार लागलेल्या रुग्णांसाठी आवश्‍यक असणारी अत्यावश्‍यक औषधीही येथे नाहीत. रिॲक्‍शन आलेल्या रुग्णांसाठीचे, झटका आलेल्या रुग्णांसाठी लागणाऱ्या इंजेक्‍शनचा देखील तुटवडा आहे. हृदयरुग्णांसाठी आवश्‍यक असणारे आणि उपलब्ध असावीत अशा औषधींचाही तुटवडा आहे.

वरिष्ठ पातळीवर मागणीचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच औषधी उपलब्ध होतील. राष्ट्रीय आरोग्य योजनेतून मिळणारा औषधींसाठीचा निधी अत्यल्प असून जिल्हा नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीतही कपात झाल्याने स्थानिक पातळीवरील औषधी खरेदीला मर्यादा आल्या आहेत. 
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

प्रथमोपचाराचे साहित्य आणि औषधीही मिळेना
कॅज्युअलिटीमध्ये आलेल्या अपघाती रुग्णाची जखम साफ करून त्यावर मलमपट्टी करण्यासाठी साधे हायड्रोजन वा बिटाडीन नाही. तर उलट्यांचा त्रास असलेल्या रुग्णाला देण्यासाठी लागणारे पित्तनाशक इंजेक्‍शनदेखील नाहीत. विषबाधा झालेल्या रुग्णाला प्रथम पोट साफ करण्यासाठी द्यायचे औषधदेखील येथे नाही. बेशुद्ध वा अपघातील रुग्णाला लघवीसाठी लागणारे साहित्य व औषधींचाही येथे तुटवडा आहे. वेदनाशामक आणि पोटदुखीसाठीच्या प्रथमोपचाराच्या इंजेक्‍शनचाही तुटवडा आहे. 

Web Title: marathwada news medicine beed