निलंग्याला मिळणार ‘हायवे अन्‌ रेल्वे

राम काळगे 
शुक्रवार, 14 जुलै 2017

निलंगा - नुकताच मंजूर झालेला राष्ट्रीय महामार्ग निलंगा शहरातून जात असल्याने व निलंगा येथून प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे शहराचे नाव देशपातळीवर झळकणार आहे. महामार्ग सर्वेक्षणासाठी केंद्राकडून काही निधी मंजूर झाला असून या कामाला लवकरच सुरवात होणार आहे.

निलंगा - नुकताच मंजूर झालेला राष्ट्रीय महामार्ग निलंगा शहरातून जात असल्याने व निलंगा येथून प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे शहराचे नाव देशपातळीवर झळकणार आहे. महामार्ग सर्वेक्षणासाठी केंद्राकडून काही निधी मंजूर झाला असून या कामाला लवकरच सुरवात होणार आहे.

निलंगा तालुका हा महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील तालुका असून औराद शहाजानीपासून दोन किलोमीटर अंतरावर कर्नाटकची हद्द आहे. तालुक्‍याचा पूर्वीच राजकीय क्षेत्रात लौकिक आहे. सीमेवर असलेल्या या तालुक्‍याने एकेकाळी राज्याचे नेतृत्व केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार केला आहे. त्यामुळे यापुर्वी या तालुक्‍याचे नाव गाजलेले आहे. निलंगा तालुक्‍याला मोठा इतिहास असल्याने कायम विविध क्षेत्रांत या तालुक्‍याचे नाव चर्चेत राहिले आहे. 

निलंगा येथून हैदराबाद, जहराबाद, बीदर, निलंगा, निटूर, बाभळगाव मार्गे लातूर, अशा नवीन राष्ट्रीय महामार्गाला नुकतीच केंद्राकडून मंजुरी मिळाली असून हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. कामगार कौशल्य विकासमंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांनी हा महामार्ग मंजूर झाला असून त्याबाबत निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर झाला आहे. या महामार्गामुळे निलंगा हे शहर देशाच्या नकाशावर येणार असून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. या महामार्गाला अद्याप नोंदणी क्रमांक जाहीर झाला नसून लवकरच महामार्गाला क्रमांक मिळणार आहे. गुलबर्गा मार्गे निलंगा असा रेल्वेमार्ग प्रस्तावित असून या रेल्वे मार्गाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे (लोहमार्ग) मिळाल्यानंतर तालुक्‍यातील व्यापाऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या भागातून रेल्वे व महामार्ग गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या भागातील शेती व गावांना महत्त्व प्राप्त होणार आहे. महामार्गाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे तर रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे व येथील आमदार सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात केबिनेटमंत्री असल्याने ही दोन्ही कामे गतीने होण्याची अपेक्षा आहे.

निलंगा येथून राष्ट्रीय महामार्गाला केंद्राकडून मंजुरी मिळाली असून या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वेमार्गाचा प्रस्तावही केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आला असून तो मंजूर करण्यासाठी संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्ग व रेल्वेमार्ग यामुळे दळणवळणाच्या सुविधेबरोबर तालुक्‍याचा लौकिक देशपातळीवर वाढणार आहे.
- अरविंद पाटील निलंगेकर, निलंगा 

निलंगा, निटूर, बाभळगाव, बिदर, हैदराबाद या महामार्गांना केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. या महामार्गामुळे निलंगा मतदारसंघाची देशपातळीवर ओळख होणार आहे. हा दूरचा महामार्ग असल्याने व मोठे काम असल्याने जास्त कालावधी लागणार आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांनी अधिक व जलद निधी मिळण्यास मदत होणार आहे.
- राजाभाऊ शिंदे, उपअभियंता, निलंगा.

Web Title: marathwada news nilanga railway