चार आमदार भाजपचे; पंकजांच्या किती कामाचे?

दत्ता देशमुख
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

मुंडे राज्यात नेतृत्व करत असल्याने या चार शिलेदारांनी जिल्ह्याचा गड  सांभाळणे अपेक्षित होते. पण, तसे होण्याऐवजी यांनीच केलेले प्रताप  मुंडेंना निस्तरावे  लागत आहेत. पंकजा मुंडेंचे राजकीय महत्व आणि प्रभाव वाढवण्यासाठी हे आमदार मनापासून फारसे करताना दिसत नाहीत. एव्हढेच नव्हे तर पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय  हेतून आरोप होतात किंवा विरोधक आक्रमक होतात तेंव्हा हे आमदार चार हात दूर आणि पडद्याआड पडद्याआड राहणेच पसंत करतात असा आजवरचा अनुभव आहे. 

युद्धातील यश हे अनेकदा शांतीकाळात सैन्याने केलेल्या तयारीवर अवलंबून असते. त्यासाठी सेनापतींनी आपल्या सुभेदारांना केवळ सुभे किंवा मुकासे वाटून निश्चिंत राहता येत नाही. तुमच्या पहिल्या विजयाच्या लखलखाटात दुसऱ्या पराजयाचा काळोख दडलेला असतो असे युद्धनिती सांगते. अगामी लोकसभा आणि विधानसभेचे रणकंदन पाहता बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे शिलेदार असलेले चार आमदार त्यांना कितपत बळ देतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास जागा आहे. 

 पालकमंत्री पंकजा मुंडेंसह जिल्ह्यात भाजपचे सहा पैकी पाच आमदार आहेत. पंकजा मुंडे यांचा पाठिंबा असल्याने  अन्य चारही आमदारांना निवडणूक सोपी झाली होती . पक्षपातळीवर आगामी लोकसभा आणि विधानसभेची तयारी सुरु झाल्याने जिल्ह्यातील भाजपच्या  चार आमदारांचा पंकजा मुंडेंना आजपर्यंत किती राजकीय फायदा झाला याचा लेखाजोखा करायचा झाला तर बेरजेऐवेजी वजाबाकीचे गणित मांडावे लागेल !

एकूणच ‘सारा गाव मामाचा अन॒ एक नाही कामाचा’ अशीच गत म्हणावी लागेल. भविष्यात राज्य पातळीवर नेतृत्व करण्यासाठी त्यांची जिल्ह्याची खिंड समर्थपणे लढवणारे सवंगडी असावे लागणार आहेत. त्यासाठी मुंडे पुढच्या काळात कोणत्या खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागच्या लोकसभेवेळी देशभरात मोदीलाट होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी  लोकनेते गोपीनाथराव  मुंडेंच्या दुर्दैवी निधनामुळे भाजपला जिल्ह्यात मोठी सहानुभूती मिळाली. परळीतून पंकजा मुंडें, आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मधून भीमराव धोंडे, गेवराईतून  लक्ष्मण पवार, माजलगावातून आर. टी. देशमुख व केजमधून संगीता ठोंबरे हे भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून आले . 

धोंडे वगळता इतरांना अनपेक्षित मतदान पडले. याचे कारण म्हणजे भाजपची उमेदवारी आणि पंकजा मुंडेंमुळे वंजारी  समाजाची यांना पडलेली एकगठ्ठा मते. एकूणच हे चौघेही पंकजां मुंडे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे  आमदार झाले आहेत. पण, मागील सरत्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर या चौघांकडून मुंडे यांना राजकीय बळ किंवा लाभ नाही . 

मुंडे राज्यात नेतृत्व करत असल्याने या चार शिलेदारांनी जिल्ह्याचा गड  सांभाळणे अपेक्षित होते. पण, तसे होण्याऐवजी यांनीच केलेले प्रताप  मुंडेंना निस्तरावे  लागत आहेत. पंकजा मुंडेंचे राजकीय महत्व आणि प्रभाव वाढवण्यासाठी हे आमदार मनापासून फारसे करताना दिसत नाहीत. एव्हढेच नव्हे तर पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय  हेतून आरोप होतात किंवा विरोधक आक्रमक होतात तेंव्हा हे आमदार चार हात दूर आणि पडद्याआड पडद्याआड राहणेच पसंत करतात असा आजवरचा अनुभव आहे. 

त्यांच्यावरील एकाही राजकीय आरोपांना उत्तर देण्यासाठी यातील कोणी पुढे आले नाही. भिमराव धोंडे आणि लक्ष्मण पवार या दोघांची स्थानिक पातळीवर पकड आहे. पक्ष वा मुंडे वजा केल्यानंतरही  स्वत:च्या राजकीय कर्तबगारीवर स्थानिक संस्थांमध्ये विरोधकांशी टक्कर देऊन विजय मिळवण्याचीही त्यांची ताकद आहे. 

पण, दोघेही श्रीमती मुंडेंपासून विशिष्ट अंतरावरच दिसतात. नेत्या म्हणून पंकजांना फार महत्व देण्याऐवजी स्थानिक पातळीवर स्वच:चे राजकीय महत्व वाढवण्यावर या दोघांचा भर असतो. तसे, पवारांनी गेवराई मतदार संघात ‘भाजप’ऐवजी ‘लक्ष्मणसेनेच्या’ विस्ताराव लक्ष केंद्रीत केले आहे. 

असे हे आमदार मुख्यमंत्री वा अन्य भाजप नेत्यांना भेटण्यासाठी ना मुंडेंना सोबत घेतात ना कल्पना देतात.  तर इकडे भीमराव धोंडेंचा प्रवासही पंकजांऐवजी नितीन गडकरींच्या ‘राजमार्गाने’च अधिक आहे.  आमदार आर. टी. देशमुख व आमदार संगीता ठोंबरे यांच्या माजलगाव व केज मतदार संघात मुंडेंना मानणाऱ्या वंजारा मतांची संख्या मोठी असल्याने त्यांच्याकडून ‘मुंडेनिष्ठा’ दाखवण्याचा प्रयत्न असतो.

पण, श्रीमती ठोंबरेंची निष्ठा अनेकवेळा ‘वरकरणी’च असते. कारण, परस्पर  गडकरींची व मुख्यमंत्र्यांची भेट, मतदार संघातील निर्णय घेताना मुंडेंना अंधारात ठेवणे व त्यांनी सांगीतलेल्या सुचनांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रकार मुंडे समर्थकांना रुचलेले नाहीत. श्रीमती ठोंबरे व श्री. देशमुख यांची राजकीय ताकद संशोधनाचा भाग आहे. 

पक्ष आणि मुंडे सोबतीला असतानाही श्री. देशमुख यांना जिल्हा परिषदेत पुत्राला निवडून  आणता आलेले नाही. तर, मुंडे व भाजप वगळून आपली ताकद किती हे श्रीमती ठोंबरेच सांगू शकतील. एकूणच या मंडळींचा पंकजा मुंडेंना भुतकाळात तर फायदा झालाच नाही. भविष्यात राजकारण करताना आणि विरोधकांशी टक्कर देताना असले शिलेदार असतील तर पंकजा मुंडे राजकीय गड कसा सर करणार असा प्रश्न आहे. 

त्यामुळे पंकजा मुंडे यांना येत्या काळात जिल्ह्यात आणि मतदारसंघात अधिक संपर्क वाढवून अधिक वेळ द्यावा लागेल . त्याबरोबरच जुन्या नव्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सांगड घालून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड बसवावी लागेल.

Web Title: Marathwada news Pankaja Munde bjp MLA