उमरगा तालुक्‍यात धो धो पाऊस

उमरगा तालुक्‍यात धो धो पाऊस

उमरगा - उमरगा शहरासह तालुक्‍यात मंगळवारी (ता.सहा) मध्यरात्रीनंतर झालेल्या दमदार पावसाने पेरणीच्या आशा पल्लवित केल्या असल्या तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, उमरगा-डिग्गी मार्गावरील बेडगा गावाजवळील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने डिग्गी-उमरगा रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद झाली होती. तर बेडगा - डिग्गी रस्त्यावर विद्युत खांब पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. एकाच पावसात शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून भिकार सांगवी तलाव भरला असून दगडधानोरा, कसगी साठवण तलावातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. 

मंगळवारी सायकांळी ढगाळ वातावरण होते. रात्री सात नंतरच बेडगा, डिग्गी, भिकार सांगवी, पारसखेडा आदी भागांत पावसाला सुरवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील नदी, नाले वाहू लागले. बेडगा येथील बेन्नीतुरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  दरम्यान, बेडगा येथील गोविंद लिंबराज पवार यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या म्हैस व गायीचा तळ्याला आलेल्या पुरामुळे बुडून मृत्यू झाला. तलाठी श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.  तसेच बाबूराव चव्हाण यांचे काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले. तर विलास माने यांच्या शेतातील काढून ठेवलेला भूईमूग पाण्यात गेला. भिकार सांगवी रात्री झालेल्या पावसात पूर्णत: भरल्याने तलावालगत असलेल्या बेडगा, दगडधानोरा, सांगवी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या पन्नासच्यावर विद्युत मोटारी पाण्यात गेल्या आहेत. तर बेडगा, सांगवी, पारसखेडा, चिंचोली जहांगीर, चंडकाळ, मुळज, त्रिकोळी आदी भागांच्या शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कसगी, कसगीवाडी, गुंजोटी, नागराळ, पळसगाव आदी भागांतही पावसाने दमदार हजेरी लावली. मुळज येथील रघुनाथ बिराजदार यांच्या शेतातील बांध फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे, सिमेंट नाल्यात मुबलक पाणीसाठा आहे.

उमरगा-डिग्गी वाहतूक ठप्प
दमदार पावसामुळे उमरगा-डिग्गी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. बेडगा गावानजीक असलेल्या फरशी पुलावरून सात ते आठ फुटांपर्यंत पाणी वाहू लागल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दुपारी पाणी ओसरल्यानंतरही वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत घर गाठावे लागले. गतवर्षीही या पुलावरून पाणी वाहत होते. दोन दिवस वाहतूक बंद होती; वर्षभरात संबंधित प्रशासनाने या पुलाची उंची वाढवून काम करण्यासाठी उपाययोजना केली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आढावा बैठकीत केवळ कागदपत्रांचा मेळ घालून लोकप्रतिनिधींसमोर माहिती देतात. प्रत्यक्षात मात्र कृती होत नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, बेडगा-डिग्गी मार्गावरील विद्युत खांब वादळी वाऱ्याने पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com