उंदराने बॅग कुरतडल्याने रेल्वेला भरपाईचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

उस्मानाबाद - उंदरांमुळे रेल्वे प्रशासनाला झटका बसला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग उंदरांनी कुरतडून प्रसादासह इतर खाद्य पदार्थांची नासाडी केल्याने, रेल्वे प्रशासनाने बारा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. 

उस्मानाबाद - उंदरांमुळे रेल्वे प्रशासनाला झटका बसला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग उंदरांनी कुरतडून प्रसादासह इतर खाद्य पदार्थांची नासाडी केल्याने, रेल्वे प्रशासनाने बारा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. 

शहरातील समतानगर भागातील रहिवासी सुंदर बोंदर हे त्यांच्या कुटुंबासह तिरुपतीला गेले होते. दर्शनानंतर 26 मार्च 2016 रोजी हे सर्वजण रेल्वेच्या एस-5 बोगीतून परतीच्या प्रवासात होते. तिरुपती ते विकाराबाद प्रवासादरम्यान बोंदर यांनी त्यांची बॅग आसनाखाली ठेवली होती. सकाळी विकाराबाद येथे उतरताना बॅग उंदरांनी कुरतडल्याचे त्यांना दिसले. या बॅगमधील खाद्यपदार्थ, प्रसाद खाऊन उंदरांनी बॅगचेही नुकसान केले. हा प्रकार त्यांनी तेथील स्टेशन मास्तरांना सांगितला. स्टेशन मास्तरांच्या सूचनेनुसार बोंदर यांनी तेथील तक्रार पेटीमध्ये लेखी तक्रार टाकली. तक्रारीची प्रत रेल्वे मंत्रालय आणि सोलापूर येथील रेल्वेच्या कार्यालयालाही दिली. रेल्वे प्रशासन नुकसान भरपाई देत नसल्याने तीन एप्रिल 2017 रोजी बोंदर यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. ग्राहक मंचकडून दोन्ही बाजू तपासण्यात आल्या. प्रवाशाची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अखत्यारीत येत नसल्याचा युक्तिवाद रेल्वे प्रशासनाने केला. "रेल्वे क्‍लेम्स ट्रिब्यूनल' अस्तित्वात असल्याने तेथे प्रकरण दाखल करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने रेल्वे प्रशासनाचा हा युक्तिवाद फेटाळला. बोंदर यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे मंचने मध्य रेल्वेच्या सोलापूर येथील यांत्रिकी विभागातील वरिष्ठ मंडल यांत्रिकी अभियंता तसेच गुडकल विभागातील यांत्रिक अभियंत्यांनी प्रवाशाला भरपाई द्यावी, असे आदेश दिले. तक्रारदारास मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये, तक्रार खर्चापोटी दोन हजार रुपयांचा या भरपाईत समावेश आहे. 

मंचचे अध्यक्ष एम. व्ही. कुलकर्णी, सदस्य मुकुंद सस्ते यांनी हा निकाल दिला आहे. बोंदर यांनी स्वतः बाजू मांडली. 

Web Title: marathwada news rat railway