जालन्यातील रेशनच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पाच लाखांचा तांदूळ जप्त, ट्रकमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद - जालना शहरातून गुजरातमध्ये काळ्याबाजारात जाणारा पाच लाख रुपयांचा तांदूळ चिकलठाणा पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. 

पाच लाखांचा तांदूळ जप्त, ट्रकमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद - जालना शहरातून गुजरातमध्ये काळ्याबाजारात जाणारा पाच लाख रुपयांचा तांदूळ चिकलठाणा पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. 

जालना येथून स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा २६ क्विंटल तांदूळ गुजरात राज्यात पाठवण्यात येत होता. मंगळवारी (ता. वीस) हा ट्रक जालना शहरातून निघाल्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येताच उपनिरीक्षक बालाजी ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी थांबवला. ट्रकमध्ये पाच लाख ७७ हजार पाचशे रुपयांचा २६ हजार २५० किलो तांदूळ होता. पोलिसांनी चौकशी करताच ट्रकचालकाची भंबेरी उडाली. त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने अधिक चौकशी केली, तेव्हा रेशनचा तांदूळ गुजरातमध्ये खुल्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले. चिकलठाणा पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ट्रक व तांदूळ असा १५ लाख ७७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. 

ट्रकचालकाला पोलिस कोठडी 
रेशनचा तांदूळ गुजरातला घेऊन निघालेला ट्रकचालक (एमएच-२१-एक्‍स-७७१) चालक रेहान खान सलीम खान (रा. महेबूबनगर, नांदेड) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी शुक्रवार (ता. २३) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ट्रकचालकासह प्रभाकर रामजी डोंगरे (रा. बापकळ, जिल्हा जालना), नाज ट्रेडिंग कंपनीचा मालक तसेच ट्रक मालक शेख गौस (रा. नयाबादी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात सहायक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी पोलिसांतर्फे युक्तिवाद केला.

Web Title: marathwada news rice black market in gujrat