सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी ‘जडाई माता’कडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जालना - सोयाबीनचा हमीभाव वाढवून शासनाने हमीभावानेच खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याच वेळी जालना येथे ‘नाफेड’ला सब-एजंट मिळत नसल्याने आतापर्यंत सोयाबीन, मूग, उडिदाचे खरेदी केंद्र सुरूच झाले नाही. मात्र, आता ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रावर जडाई माता प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, रेवगाव ही कंपनी सब-एजंट म्हणून खरेदी करणार आहे. त्यामुळे आता जालना येथे खरेदी केंद्र सुरू होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र आहे.

गतवर्षी ‘नाफेड’कडून तूर खरेदी करण्यात आली त्या वेळी जालना येथील खरेदी केंद्रावर सब-एजंट म्हणून जालना खरेदी-विक्री संघाची नेमणूक करण्यात आली होती. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली तूर जालन्यासह औरंगाबाद येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली. या तूर खरेदीसह व वाहतूक, हमाल, सुतळी आदींचे जालना खरेदी-विक्री संघाचे बिल आणि कमिशनची रक्कम शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे यंदा नाफेडच्या खरेदी प्रक्रियेमध्ये न उतरण्याचे संकेत यापूर्वीच जालना खरेदी-विक्री संघाने दिले होते. 

मात्र, शनिवारी (ता.२८) जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा मार्केटिंग अधिकारी, खरेदी विक्री संघ, सर्व बाजार समितीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत खरेदीसाठी सब-एजंट म्हणून त्या-त्या ठिकाणचा खरेदी-विक्री संघ काम पाहील अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या; परंतु जालना खरेदी विक्री संघाने खरेदीसाठी आर्थिक अडचण सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी जडाई माता प्रोड्युसर कंपनी लिमिटेड रेवगाव या कंपनीची सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी सब-एजंट म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे आता सोयाबीन, मूग, उडिदाचे नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

निकष पूर्ण असल्यास खरेदी 
नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी संबंधित माल त्यांच्या नियमांचे निकष पूर्ण करणारा असल्यास खरेदी केला जाईल. त्यानंतर तो माल वखार महामंडळाकडे पाठविला जाईल. तेथे जर खरेदी केलेल्या मालाची गुणवत्ता ही नाफेडने ठरवून दिलेल्या अटीप्रमाणे असेल तरच तो माल घेऊन त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जाणार आहेत. जो माल नाफेड घेणार नाही, त्याचे पैसे देण्याची जबाबदारी खरेदी करणाऱ्या सब-एजंटची असणार आहे.

Web Title: marathwada news soyabean udid farmer jalna