खड्ड्यांतून वाट काढत चालवावे लागते वाहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

वाशी -  बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांतून बस घेऊन जाताना चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी बसचालक व वाहकांसह प्रवाशांतून केली जात आहे.

वाशी -  बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांतून बस घेऊन जाताना चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी बसचालक व वाहकांसह प्रवाशांतून केली जात आहे.

कन्हेरी रस्त्यावरील प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात वाशीचे नवीन बसस्थानक सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. ‘आधी कळस मग पाया’ या म्हणीप्रमाणे एसटी महामंडळाने बसस्थानकाची इमारत उभी केली; मात्र या बसस्थानकात ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला नाही. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरही केवळ रस्त्याअभावी हे बसस्थानक वर्षभर सुरू झाले नाही. परिसरातील रिकाम्या भूखंडाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्यांनी बसस्थानकासाठी रस्ता उपलब्ध करून दिला; मात्र बसस्थानकात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे पक्के काम करण्यात आले नाही. केवळ मातीकाम करून या रस्त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे; मात्र परतीच्या जोरदार पावसाने या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मातीमुळे रस्ता निसरडा झाला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. 

प्रवाशांनी खचाखच भरलेली बस या रस्त्यावरून ने-आण करताना चालकांचा जीव टांगणीला लागत आहे. या रस्त्याजवळून महावितरणची मुख्य वीज वाहिनी गेली आहे. या वाहिनीच्या एका खांबाचा ओढा या रस्त्यावरच येत आहे. या खांबाला खेटूनच बसची वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे लांब पल्याच्या बहुतांश बस बसस्थानकात येतच नाहीत. या बस अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ थांबून तेथेच प्रवाशांची चढ-उतार करून पुढे जातात. या धोकादायक रस्त्यावरून बस चालविणे अवघड असल्यामुळे रस्त्याचे मजबुतीकरण केले नाही तर बसस्थानकात बस घेऊन न येण्याची भूमिका चालक घेणार आहेत. रस्त्याच्या दुर्दशेबाबत अधिकाऱ्यांना चालकांनी तोंडी सूचना दिलेल्या आहेत; मात्र याबाबत काहीच हालचाल होत नसल्याचे चालकांनी सांगितले.

Web Title: marathwada news st bus