निकृष्ट बांधकामामुळे सिमेंट बंधाऱ्याला गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

जेवळी - लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग उस्मानाबाद यांच्याकडून जेवळी (ता. लोहारा) येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याला निकृष्ट बांधकामामुळे गळती लागली आहे. सविस्तर चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                          

जेवळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माळी यांनी कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग उस्मानाबाद यांच्याकडे मंगळवारी (ता. २७) निवेदन देण्यात आले. जेवळी येथील शिवारात, वडगाव नदीवर यशवंत दत्तात्रय गाडेकर यांच्या शेताजवळ याच वर्षी एप्रिल-मे महिन्यात लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग उमरगा यांच्याकडून जवळपास बारा लाख रुपये खर्चुन सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. अद्यापही काही कामे अर्धवट आहेत. या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे. या ठिकाणी वाळूऐवजी डस्ट, कमी प्रमाणात सिमेंट याबरोबरच या कामाचे व्यवस्थित क्‍युरिंग करण्यात आले नाही. हे काम निकृष्ट होत असल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. परंतु संबंधित गुत्तेदाराने कोणालाही न जुमानता काम पूर्ण केले. तसेच संबंधित विभागाकडून या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. मात्र या बंधाऱ्याला तडे गेले असून, यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतरही बंधाऱ्यात पाणीसाठा होत नसल्याचे चित्र आहे. या सिमेंट बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाहून जात आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष माळी यांनी कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग उस्मानाबाद यांच्याकडे निवेदन देऊन या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व बंधारा त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी केली आहे.

दिलेली तक्रार तथ्यहीन असून या बंधाऱ्याचे काम चांगल्या प्रकारे होत आहे. याबाबत कुठल्याही चौकशीला तयार आहोत.
- एस. सी. सय्यद, शाखा अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग.

Web Title: marathwada news water