मराठवाड्यावर चिंतेचे ढग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

औरंगाबाद  - जून संपून जुलै महिन्याला सुरवात झाली तरी मराठवाडा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बहुतांश भागात पेरण्या आटोपत आहेत. मात्र, पाऊसच नसल्याने पिके धोक्‍यात आली आहेत. या आठवड्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा काही भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्‍यामुळे गेल्‍या चार वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद - वारंवार हुलकावणी
औरंगाबादेत रविवारी अल्पसा पाऊस झाला. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. आतापर्यंत सुमारे ८० टक्‍क्‍यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके धोक्‍यात आली आहेत. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या २० टक्के म्हणजे १३८.८० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जालना : ७५ टक्‍क्‍यांवर पेरणी
जालना जिल्ह्यात ७५ टक्‍क्‍यांवर पेरणी झाली असून गेल्या १० दिवसांपासून पाऊस नसल्याने हलक्‍या जमिनीतील पिके माना टाकत आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. वार्षिक सरासरीच्या तुलनेत २२.६२ टक्के पाऊस झाला आहे.

बीड : ८७ टक्के पेरण्या पूर्ण
बीडमध्ये सुरवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत ५.७६ लाख हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बहुतांश भागांतील खरीप पिके सुकू लागली आहेत. आगामी आठ दिवसांत पाऊस न झाल्यास काही भागांत दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची चिन्हे आहेत.

लातूर : पंधरा दिवसांपासून प्रतीक्षा 
लातूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस झाल्याने बहुतांश भागातील पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सुमारे आठ ते दहा दिवस पाऊस लांबल्यास पिके धोक्‍यात येऊ शकतात.

उस्मानाबाद : ५३ टक्के पेरण्या 
उस्मानाबाद जिल्ह्यात ५३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, तेरा दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवसात पाऊस न झाल्यास पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३६ मिलिमीटर पाऊस झाला असून सोयाबीनची शंभर टक्के पेरणी झाली.

नांदेड : दुबार पेरणीचे संकट
नांदेड जिल्ह्यात सहा दिवसांनंतर अल्प पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीची चिंता आहे. हीच परिस्थिती हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात आहे.

Web Title: marathwada news weather