मराठवाड्यातील डाळिंब युरोपात रवाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

औरंगाबाद - मराठवाड्यातून युरोप खंडात डाळिंबाची निर्यात होणार आहे. यासाठी कृषी पणन मंडळ आणि करमाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या पुढाकाराने सुमारे 500 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची युरोपियन "अनार नेट'वर नोंदणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 100 शेतकरी निर्यातीसाठी सज्ज झाले असून, शनिवारी (ता. 15) 23 शेतकऱ्यांचे डाळिंब लंडन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमला निर्यात झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक गजानन वाघ यांनी दिली.

देशांतर्गत बाजारपेठेतील दराच्या तीनपट म्हणजेच 117 रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याचे कंपनीचे संचालक भारत सपकाळ यांनी सांगितले.

करमाड, वाकुळणी परिसरांत चार हजार एकरवर डाळिंबाचे जाळे पसरले आहे. गतवर्षी करमाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापन करण्यात आली होती.

यात बहुसंख्य डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग आहे. यंदा मृग बहरातील भगवा जातीचे डाळिंब बाहेरील देशांत निर्यात करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यासाठी 500 वर शेतकऱ्यांची युरोपियन "अनार नेट'वर रीतसर नोंदणी करण्यात आली होती. सुरवातीला 100 पैकी 23 शेतकऱ्यांचे "रेसिड्यू फ्री' डाळिंब सॅम्पल चाचणीत उत्तीर्ण झाले. पणन मंडळातर्फे निर्यातीसाठी पुढाकार घेण्यात आला.

Web Title: marathwada Pomegranate Export in Europe