मराठवाड्यात रिमझिम सरींचीही विश्रांती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मराठवाड्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून काही भागांत सुरू झालेल्या रिमझिम सरींनीही आज काहीशी विश्रांती घेतली. ढगाळ वातावरण मात्र कायम होते.

औरंगाबाद - मराठवाड्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून काही भागांत सुरू झालेल्या रिमझिम सरींनीही आज काहीशी विश्रांती घेतली. ढगाळ वातावरण मात्र कायम होते.

औरंगाबाद शहरात काल दिवसभर अधूनमधून रिमझिम होत होती. रात्री उशिरा सरीवर सरी कोसळत होत्या; मात्र जोर नव्हता. आज सकाळी साडेआठपर्यंत शहरात १७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी एक दोन वेळा रिमझिम झाली. त्यानंतर तीही थांबली होती.

नांदेडला २७ मिमी पाऊस
नांदेड - नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी काल रात्रीही पाऊस झाला. किनवट तालुक्‍यासह माहूरमधील चारपैकी तीन मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, कंधार, भोकर तालुक्‍यांतही चांगला पाऊस झाला. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २७.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज नांदेड शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती होती. काही ठिकाणी रिमझिम झाली. 

परभणीत भिजपाऊस
परभणी - जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून केवळ भिजपाऊस सुरू आहे. आज सकाळी आठपर्यंत तो सुरू होता. गेल्या २४ तासांत ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः परभणी- ७.८८, पालम- १०.६७, पूर्णा १२, गंगाखेड ७, सोनपेठ १२, पाथरी ७.३३, जिंतूर २१.६७, मानवत ८.

हिंगोलीत रिमझिम
हिंगोली - हिंगोली शहरासह तालुक्‍यातील खांबाळा, भांडेगाव, साटंबा, बळसोंड, बांसबा, नरसी, कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा, बाळापूर, वसमत तालुक्‍यातील कुरुंदा, गिरगाव, हयातनगर, हट्टा, करंजाळा परिसरात आज काही वेळ रिमझिम पाऊस झाला. सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्‍यांत पावसाची उघडीप होती. 

पाच मिनिटांत पाऊस पसार
लातूर - शहर व जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आज उघडीप दिली. शहरात दुपारी ढगाळ वातावरण तयार होऊन दमदार पावसाला सुरवात झाली; मात्र पाचच मिनिटांत पाऊस पसार झाला. यामुळे सर्वांचीच निराशा झाली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात चौदा तर मंगळवारी (ता.३०) दहा मिलिमीटर पाऊस झाला. त्याचा पेरणी क्षेत्राला थोडा फायदा झाला. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. काही भागांत अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत.

जालना - १७ मिमी नोंद
जालना - जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १७.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत सरासरी २३४.१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज केवळ ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम झाली.

बदनापूर शहरासह परिसरात मंगळवारी (ता. ३०) रात्री अकरा वाजेपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस बुधवारी (ता. ३१) पहाटे सहा वाजेपर्यंत बरसला. पावसात जोर नसला तरी सलग पाऊस झाल्याने शेतशिवार ओलेचिंब झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Rain Agriculture Water