esakal | Beed : वरुणराजा कोपला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा!
sakal

बोलून बातमी शोधा

Beed : वरुणराजा कोपला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा!

Beed : वरुणराजा कोपला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : यंदा वरुणराजा बीड जिल्ह्यावर कोपल्यासारखेच चित्र आहे. या हंगामात तब्बल अकरावेळी अतिवृष्टी झाली आहे. खरीप हंगाम तर हातचा गेलाच असून वीस लोकांचे बळी गेले आहेत. ४३७ जनावरेही दगावली आहेत.

सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पेरणी केली. जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, उडीद व मूग पिकाला फटका बसला. ऑगस्टअखेरपासून पावसाने कहरच केला आहे. या हंगामात तब्बल अकरावेळा अतिवृष्टी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९३३ मिलिमीटर पाऊस झाला असून ६३ पैकी ६१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद आहे. आतापर्यंत ८८ टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असून यामध्ये तब्बल पाच लाख २४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात ६८ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे.

आतापर्यंत वीस जणांचा बळी

पावसामुळे शेतजमिनी खरडून नेल्या. वीज पडून चार आणि पुरात वाहून १५ व इतर कारणांनी एक असे २० बळी गेले आहेत. ४३७ जनावरे दगावली आहेत. त्यात २९९ दुधाळ जनावरांचा समावेश आहे. २९८ झोपड्या व कच्ची घरे कोसळली. पक्की नऊ घरेही नष्ट झाली असून १९४२ घरांची काही प्रमाणात पडझड झाली आहे.

मालमत्तांचेही मोठे नुकसान

दरम्यान, रस्ते, पूल, वीजखांब अशा सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेले आहेत. १८९ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अडीचशे कोटींची मागणी

जिल्ह्यात अतिवृष्टीने पिके, जमिनी व सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात असले तरी नुकसानभरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने प्राथमिक स्थितीत शासनाकडे २५० कोटींची मागणी केली आहे.

loading image
go to top