esakal | Latur : बांधांसह डोळ्यांच्या कडाही ओल्याच
sakal

बोलून बातमी शोधा

Latur : बांधांसह डोळ्यांच्या कडाही ओल्याच

Latur : बांधांसह डोळ्यांच्या कडाही ओल्याच

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा : ‘काय करावं साहेब? मला आडीच एकर रान हाय! सोयाबीन चांगलं आलं व्हतं. पुराच्या पाण्यात. समधं गेलं. मागच्या साली बी असंच झालं. आता जगावं तर कसं? पीक तर गेलंच पर रब्बी पेरायला आता माती बी शिल्लक नाय’, असे शुक्रवारी (ता. एक) पोटतिडकीने सांगत होते ते गौर (ता. निलंगा) येथील शेतकरी शिवाजी भोजणे. त्यांच्यासोबत भागवत सावंत हेही होते. त्यांची व्यथाही हीच. पाऊस थांबला. पूर ओसरला. पण, दोघांच्या शेत-बांधांसह डोळ्यांच्या कडाही ओल्याच दिसल्या. शेतात जागोजागी निसर्गाने फटके मारलेल्या ओल्या जखमांचे ओघळ दिसत होते.

अतिवृष्टीमुळे मांजरा आणि तेरणा नदीला प्रचंड पूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. मांजरा प्रकल्पातून पाणी सोडल्याने नदीने पात्र सोडले. यामुळे निलंगा तालुक्यातील गौर, शेंद, मुगाव, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ, गिरकचाळ, वळसांगवी, चिचोंडी, हंचनाळ, नदीवाडी, हलसी-तुगाव, शिऊर या गावांना मोठा फटका बसला. हजारो हेक्टर खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. याती प्रातिनिधिक पाहणी ‘सकाळ’ने गौर येथे केली. यावेळी उसाचे पीक आडवे पडल्याचे दिसले. सोयाबीनची झाडे पाण्यात बुडालेली होती. काही कुजलेली होती. काहींच्या शेंगा पाण्यात तरंगत होत्या. काही शेंगात झाडावरच कोंब फुटले होते. एक झाड उपटून पाहिले तर कुजल्यामुळे हातात घेताच ते तुटून गेले.

गौर येथील भागवत सावंत आणि शिवाजी भोजने यांना प्रत्येकी एक हेक्टर जमीन आहे. नदीकाठी पेरणी केलेले त्यांचे संपूर्ण सोयाबीन वाहून गेले. आता रब्बी पेरणीसाठी मातीही शिल्लक नाही. अशीच अवस्था मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकांचीही झालेली दिसली. आता पूर ओसरला आहे. पण, सतत चार दिवस पिके पाण्यात असल्याने ती कुजली आहेत. शेगांना जागेवर कोंब फुटले आहेत. या कोंबाकडे पाहून सावंत आणि भोजने अधिक व्यथित झाले. मोठा खर्च आणि मेहनत करून खरीप हातचा गेला. त्यातून आता काहीच मिळणार नाही. पण, रब्बीसाठी जमीन कशी तयार करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. थोड्याफार फरकाने हीच व्यथा इतर शेतकऱ्यांची आहे.

प्राथमिक अंदाजानुसार जवळपास एक हजारांपेक्षा अधिक हेक्टरचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आदेश देण्यात आले आहेत. किती नुकसान झाले हे पंचनामे करून अहवाल दाखल केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

- गणेश जाधव, तहसीलदार

loading image
go to top