अजूनही मराठवाडा कोरडाठाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम
जालना - जिल्ह्यात रविवारी (ता. २८) दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी ८.५० मिलिमीटर एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिलिमीटर एवढी आहे, त्यात ता. एक जूनपासून रविवारपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०७.२७  मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

आतापर्यंत केवळ ३२४ मिलिमीटर पाऊस; २३ टक्‍के वार्षिक सरासरी
औरंगाबाद - यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज मराठवाड्याबाबत खोटा ठरला. जुलै महिना संपत आला तरीही मराठवाड्यात काही मंडळे सोडता संपूर्ण भाग कोरडाठाक आहे. आतापर्यंत विभागात रविवारपर्यंत (ता. २८) ३२४.४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद सर्वात कमी आहे. वार्षिक पावसाची सरासरीही २३ टक्‍के असल्याने याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम जाणवत आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, आणि पैठणची काही मंडळे सोडता इतर तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. सिल्लोड तालुक्‍यात अजिंठा, अंभई या मंडळांत तर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना नांदेड जिल्ह्यातील काही भागांत आठवड्याभरापासून पावसाचा थेंबही नव्हता. रविवारी सहा ते ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातही २२ ते २५ जुलैपर्यंत पाऊस नव्हता. रविवारी ४ ते २२ मिलिमीटर पाऊस नोंदविला आहे. बीड जिल्ह्यात ६२ मंडळांत एक-दोन मंडळे सोडल्यास गेल्या आठवड्याभरापासून पाऊस नाही. अशीच परिस्थिती लातूर जिल्ह्यात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या रविवारी पाऊस होता.

अजूनही या जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यात अनेक विभागांत उगवून आलेली पिके पावसाआभावी वाळून गेली. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. मोठा पाऊस नसल्यामुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस येण्याअगोदरच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. यातील अनेक पिके वाया गेली आहेत. आता खरीप हातातून निघून गेला आहे. रब्बीसाठी तरी चांगला पाऊस पडेल, याच आशेने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Rain Water Farmer Drought