कारवाईत पुढे अन्‌ गुन्हे नोंदविण्यात मागे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

औरंगाबाद - अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकरणात कारवाईची आकडेवारी साडेतीन हजारांवर पोचली असताना वाळू माफीयांवर गुन्हे दाखल करताना सरकारी यंत्रणा मात्र, कच खात असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत अवैध वाळू उपसाप्रकरणी मराठवाड्यात जवळपास साडेतीन हजार कारवाया करण्यात आल्या. त्याचवेळी प्रशासनाने गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या केवळ 155 इतकी आहे.

सतत दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्याला गेल्यावर्षी पावसाने दिलासा मिळाला. गेल्या चार वर्षांपासून नदीपात्रे कोरडीठाक पडलेली असताना माफीयांनी मात्र वाळूसाठी ही पात्रे ओरबडून काढली. कोरड्याठाक नदीपात्रांमधून अवैध वाळू उपसा करण्यात आला. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाळू माफीयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्यांवर महसूल विभागाचा जास्त भर आहे. यातून वाळू माफियांचेच जास्त फावले.

गेल्या नऊ महिन्यातील साडेतीन हजारांच्यावर कारवायांमधून सरकारी तिजोरीत नऊ कोटी 12 लाख 43 हजार रुपये जमा झाले आहेत. तर दुसरीकडे 155 गुन्हे नोंदवण्यात येऊन 73 जणांना अटक करण्यात आली. एकूण 56 वाहने जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, लातूर आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

नऊ महिन्यातील कारवाया
जिल्हा -------- कारवाईची संख्या ---- दाखल गुन्हे
-----------------------------------
नांदेड ------------ 948 ---------- 14
परभणी ----------- 503 ---------- 45
लातूर ------------ 563 ---------- 00
औरंगाबाद --------- 493 ---------- 40
बीड ------------- 283 ---------- 08
जालना ----------- 208 ---------- 43
हिंगोली ---------- 228 ---------- 00
उस्मानाबाद -------- 218 ---------- 05
-------------------------------------
एकूण ------------ 3,444 ------- 155

Web Title: marathwada sand issue