‘मशिप्र’च्या अध्यक्षपदी पुन्हा सोळुंके

Mashipra-Selection
Mashipra-Selection

औरंगाबाद - मराठवाडा शिक्षणप्रसारक मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली. यानिमित्ताने पुन्हा एकदा श्री. सोळुंके, चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध करीत विरोधी गटाला मोठ्या फरकाने पराभूत केले. नवीन सदस्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांनी ऐनवेळी रंगत आणण्याचा केलेला प्रयत्नदेखील अपयशी ठरला. 

देवगिरी महाविद्यालयात सोमवारी (ता. चार) सकाळी दहा वाजता निवड प्रक्रिया पार पडली. शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा शिक्षणप्रसारक मंडळावर माजी सरचिटणीस मधुकरराव मुळे यांची सत्ता होती; पण १० जुलै २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव करून आमदार चव्हाण, सोळुंके, पंडित यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. ते सोमवारी झालेल्या निवडणुकीत पुन्हा सिद्ध झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोळुंके यांना २७७, तर त्यांचे विरोधक पानसंबळ यांना केवळ ५२ मते मिळाली. उपाध्यक्षपदी पंडित (२७९) व शेख सलीम शेख अहेमद (२७७) यांची निवड झाली. सरचिटणीसपदी २८० मते घेऊन चव्हाण, सहचिटणीसपदी प्रभाकर पालोदकर व अनिल नखाते २७९, तर कोषाध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश येळीकर २७९ मते घेऊन विजयी झाले. 

चव्हाण गटाने संस्थेच्या सदस्यांमध्ये तब्बल १८२ नवीन सदस्यांचा समावेश केला. यामुळे सर्वसाधारण सदस्यांची संख्या ३४३ पर्यंत पोचली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, यासाठी विरोधी गटाने धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली; मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे निवडणुकीत जुन्या-नवीन सदस्यांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

अन्य कार्यकारिणी अशी
कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर, कार्यकारिणी सदस्यपदी मोहन सावंत, लक्ष्मणराव मनाळ, हेमंत जामकर, अभिजित आवरगावकर, भारत साळुंके, विजय सोळंके, दत्तात्रय पाटील, भीमराव जाधव, आप्पासाहेब पाटील, डॉ. प्रकाश भांडवलदार, विश्‍वास पाटील, त्र्यंबकराव पाथ्रीकर, विवेक भोसले, कल्याण तुपे आदींचा यात समावेश आहे.

विरोधकांनी नव्या सदस्यांच्या नेमणुकीवरून रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागील पाच वर्षांत मंडळात केलेले नावीन्यपूर्ण बदल, शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या उच्च प्रतीच्या सुविधा यांमुळे जुन्यासह नवीन सदस्यांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला. हा विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू.
- आमदार सतीश चव्हाण, सरचिटणीस, म.शि.प्र.मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com