लोटला भीमसागर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

विद्यापीठ नामविस्तार दिनाचा प्रचंड उत्साह

विद्यापीठ नामविस्तार दिनाचा प्रचंड उत्साह
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त "जय भीम'च्या प्रचंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शहरासोबतच मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारे आबालवृद्धांचे लोंढे विद्यापीठ गेटवर दाखल होत होते. सकाळी सहापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होण्यासाठी अनुयायांच्या रांगा लागल्या होत्या. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून येणाऱ्या आणि एकापाठोपाठ धडकणाऱ्या लोंढ्यांनी संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता.

वैचारिक साहित्याची विक्री
विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी साहित्याच्या विक्रीची दुकाने लावण्यात आली होती. डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक आणि आर्थिक विचार, सावित्रीबाई फुले जीवनकार्य, बालकों के लिए बुद्ध धम्म, फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, भारताचे भाग्यविधाते, भीमाई, जातिभेद निर्मूलन, शिवाजी कोण होता?, ऍट्रॉसिटी ऍक्‍ट, पवनी के स्तूपपर अतिक्रमण, डॉ. बाबासाहेब नसते तर..., बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. आंबेडकरांनी विपश्‍यना का नाकारली?, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, भारतातील जाती आदी पुस्तके विक्रीला होती.

प्रबोधन अन्‌ संचलन
समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांतर्फे प्रबोधनात्मक संचलन व नाटिका सादर करण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते संजय झट्टू यांनी संपूर्ण परिसरात पत्रके वाटून व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती दिली. अनेक संस्था, संघटनांनी पिण्याच्या पाण्याच्या पाऊचची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे अन्नदानाचीही व्यवस्था करण्यात आली होती. विविध पक्ष-संघटनांतर्फे संपूर्ण परिसरात प्रबोधनाच्या कार्यक्रमांसाठी, तर राजकीय नेत्यांच्या भाषणांसाठी स्टेजही उभाण्यात आले होते.

"बार्टी'चा पथदर्शी प्रकल्प
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) महिलांच्या बचत गटांची नावनोंदणी करण्याच्या पथदर्शी प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. यानिमित्ताने बचत गटांची नावनोंदणी झाली. दिवसभरात जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक बचत गटांनी नावनोंदणी केली. या बचत गटांना "बार्टी'तर्फे प्रशिक्षण देऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे विभागीय प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे "बार्टी'तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, साने गुरुजी अशा विविध महापुरुषांच्या पुस्तकांवर तब्बल 85 टक्के सूट देण्यात आल्याने या पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर तोबा गर्दी झाली होती.

Web Title: marathwada university day