मराठवाड्याला टंचाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

धरणात केवळ 19 टक्‍केच पाणी, पिण्याच्या पाण्याचे संकट

धरणात केवळ 19 टक्‍केच पाणी, पिण्याच्या पाण्याचे संकट
औरंगाबाद - पावसाळ्यातील तिसरा महिना सुरू झाला तरी अपेक्षित पाऊसच पडत नसल्याने मराठवाड्यातील सर्व 867 धरणांत केवळ 19.55 टक्‍के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ऐन पावसाळ्यातच पाणीसाठा वाढण्याऐवजी घट होत असल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

मराठवाड्यात गत वर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या धरणांत तब्बल 70 टक्‍के पाणीसाठा होता. मात्र, यंदा वाढ होण्याऐवजी त्यात घटच होत आहे. मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ 19.55 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात 22.86 टक्‍के असलेला 11 मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा 22 टक्‍क्‍यांवर आला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत सुरू असलेले टॅंकर व विहिरी अधिग्रहणाच्या प्रमाणावरून भूजलस्थिती स्पष्ट होते.

35 मध्यम प्रकल्प कोरडेच
मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 35 प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंबही नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 13 तर जालना जिल्ह्यातील दोन, बीड जिल्ह्यातील नऊ, लातूर जिल्ह्यातील तीन, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच, नांदेडमधील दोन व परभणी जिल्ह्यांतील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

Web Title: Marathwada Water Shortage rain