मराठवाड्यात लहरी पाऊस

कुठे जोरदार तर काही भागात हलक्या सरी
Meteorological Department weather update
Meteorological Department weather updatesakal

औरंगाबाद : मृग नक्षत्र संपले तरी मराठवाड्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीचे काम खोळंबले आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहेत. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी बऱ्यापैकी पाऊस झाला. जिल्ह्यात मात्र पत्ता नव्हता. औरंगाबाद शहरात दुपारी तुरळक पाऊस झाला तर जालन्यात शिडकावा झाला. परभणीत काहीकाळ जोरदार पाऊस झाला.

उस्मानाबाद शहरासह परिसरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. मॉन्सून दाखल झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शहर परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या काही भागात यापूर्वी अधूनमधून तुरळक पाऊस होत होता. मात्र शहराला पावसाची हुलकावणी होती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास शहराच्या काही भागात हलका पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार पाऊस झाला. यंदाच्या हंगामात हा पहिलाच चांगला पाऊस झाल्याचे शहरवासीयांना पाहायला मिळाला.

औरंगाबाद शहरातील काही भागात हलका पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत ‘एमजीएम’मध्ये ३.३ तर चिकलठाणा वेधशाळेत ०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना शहरात दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. भोकरदनला दुपारी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मंठा, घनसावंगी, अंबड परिसरातही पावसाचा शिडकावा झाला. कुंभार पिंपळगाव, केदारखेडा, जामखेड, रोहिलागड परिसरात रिमझिम झाली. बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर परिसरात दहा मिनिटे पाऊस झाला तर नांदेड शहरात तुरळक पाऊस झाला.

गेल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या परभणीकरांना सायंकाळी दिलासा मिळाला. सायंकाळी साडेसहानंतर अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

लातूर परिसरात पावसाने हजेरी लावली. आधी हलका, त्यानंतर काहीकाळ चांगल्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त लातूरकराना काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये पाऊस असा ः लातूर ३३.९, औसा ४६.५, अहमदपूर १०४.०, निलंगा ३९.१, उदगीर १११.८, चाकूर ७४.५, रेणापूर ६०.८, देवणी ५२.७, शिरुर अनंतपाळ ८१.४, जळकोट ८८.

दृष्टिक्षेपात

  • उस्मानाबाद शहरात सरी

  • परभणीत जोरदार हजेरी

  • औरंगाबादेत तुरळक सरी

  • धारूरमध्ये हलका पाऊस

  • नांदेड शहरात रिमझिम

  • जालन्यात कमी-अधिक

  • लातूरकरांना दिलासा

वीज पडून तरुणाचा मृत्यू

फुलंब्री : परिसरातील ताजनापूर शिवारात वीज पडून शिरोडी (बु., ता. फुलंब्री) येथील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. प्रवीण काकासाहेब साळुंके (वय ३१) असे वीज पडून ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. वामन रामराव साळुंके (६०) हे गंभीर जखमी झाले. प्रवीण साळुंके व वामन साळुंके हे बाजार सावंगी (ता.खुलताबाद) येथून दुचाकीने शिरोडी येथे जात होते. वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून ते झाडाखाली थांबले. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. परिसरातील ग्रामस्थांनी दोघांनाही बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून प्रवीण साळुंके यास मृत घोषित केले. वामन साळुंके यांना उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे. खुलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com