अतिवृष्टी झालेल्या तालुक्‍यात विहिरी आता गाठू लागल्या तळ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडण्याची चिंता 

औसा - तालुक्‍यात तीन-चार वर्षे पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. गतवर्षी तर सरासरीच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला. पावसाळ्यात शेवटी अतिवृष्टी झाली आणि मागील तीन-चार वर्षांचे दुष्काळाचे शुक्‍लकाष्ठ या पावसाने पुसून टाकले. एवढा पाऊस होऊनही सध्या पाणीपातळी कमालीची खालावत चालली आहे. 

रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडण्याची चिंता 

औसा - तालुक्‍यात तीन-चार वर्षे पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. गतवर्षी तर सरासरीच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला. पावसाळ्यात शेवटी अतिवृष्टी झाली आणि मागील तीन-चार वर्षांचे दुष्काळाचे शुक्‍लकाष्ठ या पावसाने पुसून टाकले. एवढा पाऊस होऊनही सध्या पाणीपातळी कमालीची खालावत चालली आहे. 

तालुक्‍यात यंदा जूनच्या सुरवातीलाच चांगला पाऊस सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्यास सुरू झाल्या. भादा, बोरगाव, भेटा, आंदोरा, शिवलीचा काही भाग वगळता खरिपाच्या 80 टक्के पेरण्या जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झाल्या. पिकांची उगवण चांगली होऊन ती जोमदार आली; परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व संपूर्ण ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. सप्टेंबरमध्ये मात्र पावसाने कहर करीत अतिवृष्टी केली. मागील दहा-पंधरा वर्षांतील पावसाच्या नोंदीच मोडीत काढल्या आणि ऑगस्टपर्यंत कोरडे असलेले तलाव, विहिरी, नदी-नाले पाण्याने तुडुंब भरले. तालुक्‍यातील सगळ्याच साठवण व पाझर तलावांनी अंतिम कक्षा ओलांडली. यंदा भरपूर पाऊस पडल्याने विहिरी व तलावांतील पाणी भरून राहील ही शेतकऱ्यांना अपेक्षा होती; पण जानेवारीतच अनेक भागांतील विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

औसा तालुक्‍यात यंदा 976.42 मि.मी. इतका पाऊस झाला. तालुक्‍याची वार्षिक सरासरी 813 मि.मी. इतकी आहे. त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 120 टक्के झाला. तालुक्‍यात सात महसूल मंडळ असून, मंडळनिहाय झालेला पाऊस असा - औसा- 956, लामजना- 978, किल्लारी- 1167, मातोळा- 959, भादा- 822, किनीथोट- 1032, बेलकुंड- 918. मागील पाच-सहा वर्षांत न भरलेले औसा तालुक्‍यातील दापेगाव, खुंटेगाव व शिवली हे तीन साठवण तलाव तर तुंगी, चिंचोली, सोमदुर्ग, सारोळा यांसह बारा लघुप्रकल्प आणि शेकडो पाझर तलाव; तसेच बारा हजार आठशे पासष्ट विहिरी ओव्हरफ्लो झाल्या होत्या. यावर्षी तालुक्‍यात जेवढा पाऊस झाला त्यापैकी 55 टक्के पाऊस जून-जुलै व ऑगस्टमध्ये झाला होता. तर उर्वरित 65 टक्के पाऊस हा सप्टेंबर व ऑक्‍टोबरच्या पहिल्या काही दिवसांत झाला. एवढा पाऊस होऊनही आतापासूनच विहिरी तळ गाठू लागल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते की काय? अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. 

Web Title: marathwada well water