लातूरः दरवर्षीच्या खर्चात बचतीसाठी मार्बलची मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अहमदपूरच्या दोडके मंडळाची वाटचाल ः सामाजिक कार्यावरही भर 

अहमदपूर(जि. लातूर)  ः येथील पु.ल.दोडके गणेश मंडळ गेल्या आठ वर्षांपासून एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहेत. त्यासाठी मंडळाने मार्बलची मूर्ती तयार करून घेतली आहे. दरवर्षी मूर्तीवर होणारा खर्च हे मंडळ सामाजिक कार्यात वापरत आहे. 

पु.ल.दोडके गुरुजींच्या स्मरणार्थ वर्ष 2009 मध्ये गणेश मंडळाची स्थापना झाली. मंडळाच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी मूर्तीवर दरवर्षीचा होणाऱ्या खर्चाचा विचार झाला. त्यातून कायमस्वरूपी मूर्ती आणण्याचा निर्णय झाला. त्यानुसार राजस्थानमधून मार्बलपासून बनवलेली दोनशे किलो वजनाची मूर्ती आणली. तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सवात हीच मूर्ती विराजमान होते. उत्सवकाळात पूजेसाठी लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. 

मंडळाचे चाळीस सदस्य आहेत. गणेशोत्सवाचा खर्च हे सदस्यच करतात. रक्तदान, सर्वरोग निदान शिबिर, रुग्णास फळवाटप आदी उपक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक वारसासंदर्भात हलते देखावे, स्वच्छतेसंदर्भात जनजागरण आदी कार्यात अग्रेसर असलेल्या या मंडळाची यंदा दशकपूर्ती आहे. 
 

मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक पाणीसाठा कमी पडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मार्बलची मूर्ती आणण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून याच मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहोत. 
- विक्रम दोडके, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marble ganesh statue from 8 years