बाजारपेठ गजबजली रंगीबेरंगी रेशमी धाग्यांनी

लातूरः राखी खरेदी करतांना महिला
लातूरः राखी खरेदी करतांना महिला

लातूर, ता. 13 : स्पंज आणि गोंड्याच्या राख्यांची जागा चकाकणाऱ्या स्टोनच्या आणि कलाकुसर केलेल्या वूडनच्या राख्यांनी घेतली आहे. वेगवेगळ्या रंगांतील आणि नानाविध प्रकारांतील या राख्यांनी लातूरकरांवर मोहिनी घातली आहे. या राख्यांच्या खरेदीबरोबरच अनेक महिला रिटर्न गिफ्टचीही खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे बहिणीने भावाला रिटर्न गिफ्ट द्यायची प्रथा आता लातुरातही वाढू लागली आहे. 


बहीण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून राखीपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा हा सण गुरुवारी (ता. 15) साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गंजगोलाईतील बाजारपेठेबरोबरच शहरातील बहुतांश दुकाने रंगीबेरंगी राख्यांनी सजली आहेत. राख्यांचे स्टॉल शहरात जागोजागी पाहायला मिळत आहेत. राख्यांची खरेदी करण्यासाठी येथे संध्याकाळच्या वेळेत महिलांची तुडुंब गर्दी होत आहे. पाच रुपयांपासून चांदीची कलाकुसर केलेल्या 850 रुपयांपर्यंच्या राख्या बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. 


प्रिया गिफ्टचे अमर खाबानी म्हणाले, की स्पंजवर कलाकुसर चिकटविलेली राखी किंवा गोंड्याची राखी पूर्वी सर्रास मिळत होती. आता तशा राख्या लवकर मिळणार नाहीत. त्याऐवजी बाजारपेठेत मेटल पॅच असलेल्या, अमेरिकन स्टोनने सजविलेल्या आणि वूडनच्या राख्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. मनमोहक कलाकुसर केलेल्या वूडनच्या राख्या पन्नास रुपयांपासून मिळत आहेत.

तर अमेरिकन स्टोनच्या राख्या शंभर रुपयांपासून पुढे आहेत. राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. त्यानंतर आता बहीणही रिटर्न गिफ्ट देऊ लागली आहे. वाढदिवसाच्या सोहळ्यात असणारी रिटर्न गिफ्टची ही प्रथा आता राखीपौर्णिमेच्या सोहळ्यात रूढ होऊ लागली आहे. त्यामुळे चॉकलेट, घड्याळ, पेन, स्प्रे, गॉगल, स्मार्ट वॉच, रिंग अशा वस्तूंनाही चांगलीच मागणी आहे. 

राखीवर येऊन बसला पबजी 
राखी पौर्णिमेला खरी धम्माल असते ती बच्चेकंपनीची. त्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवून मोबाईलच्या स्क्रीनवर झळकणारे छोटा भीम, अँग्री बर्डस्‌, पोकेमॉन, मोटू-पतलू, स्पायडर मॅन, आयर्न मॅन असे अनेक पात्र राख्यांवर पाहायला मिळत आहेत. इतकेच नव्हे, तर पबजी या बहुचर्चित गेमवर आधारित राखीही बाजारात आली आहे. विशेष म्हणजे या राख्या प्रथमच बेल्ट स्वरूपात आल्या आहेत. काही राख्यांमध्ये तर विद्युत रोषणाईसुद्धा आहे. या राख्यांबरोरच बाल गणेश, बाल हनुमान, बाल कृष्णाची छबी असलेल्या राख्यांना चिमुकल्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com