गरीबांच्या गरजा पूर्ण करणारा बाजार : कोणता आणि कुठे आहे हा बाजार  

प्रमोद चौधरी
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नांदेड :  स्पर्धा गतिमान झाली. प्रत्येकजण पैश्‍याच्या मागे धावताना दिसत आहे. महागाईही गगनाला पोचली. त्यामुळे गरीबांना आपल्या गरजा पूर्ण करता येणे शक्य नाही. परिणामी, या गरजा भागविण्यासाठी व्यावसायीक सरसावत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. 

नांदेड :  स्पर्धा गतिमान झाली. प्रत्येकजण पैश्‍याच्या मागे धावताना दिसत आहे. महागाईही गगनाला पोचली. त्यामुळे गरीबांना आपल्या गरजा पूर्ण करता येणे शक्य नाही. परिणामी, या गरजा भागविण्यासाठी व्यावसायीक सरसावत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. 

श्रीमंतांनी फेकून दिलेल्या भंगार गोळा करून, डोक्यावर ऊन-वारा-पाऊस झेलत गल्लोगल्ली हातगाडी घेऊन भंगार गोळा करणारे सर्वच शहरामध्ये दिसतात. हे लोकही गरीब घटकांतीलच असलेतरी, भंगार गोळा करून त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून स्थिरावलेले आहेत. हे भंगार घेऊन हे लोक काय करत असतील, असा प्रश्‍न निश्‍चितच प्रत्येकाला पडत असेल.  

Image may contain: 3 people, crowd, shoes and outdoor
दर रविवारी खरेदीसाठी अशी गर्दी होते (छायाचित्र ः मुनवर खान)

दर रविवारी भरतो भंगार बाजार
पोटाची खळगी भरण्याच्या गरजेतून नांदेड शहरातील देगलूर नाका भागामध्ये दर रविवारी भंगार बाजार भरतो. उर्दू घराच्या समोर भरत असलेल्या या बाजारात इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, स्कूल बुक्स, गाइड, मोबाइल व त्याचे पार्ट, टू व्हीलर, फोर व्हीलर आदींचे सामान कमी किमतीमध्ये मिळते. याशिवाय टीव्ही, संगणक, लॅपटॉप, इस्तरी, स्पीकर, किबोर्ड, मॉनिटर, सायकल आदी वस्तूही कमी किमतीत मिळत असल्याने गरीबांच्या गरजा पूर्ण होत आहेत. तीन वर्षांपासून हा बाजार भरत असून, सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातीलच नव्हेतर निजामाबाद, हैद्राबाद येथील व्यापारीही या भंगार बाजारात आपली दालने लावत आहेत. 

Image may contain: 3 people, shoes, crowd and outdoor
जुन्या वस्तूंसोबतच जुने कपडे खरेदीलाही गर्दी (छायाचित्र ः मुनवर खान)

जुन्या कपड्यांचेही आहे दालन
‘गरिबांचे सदाबहार वस्त्रभांडार म्हणूनही या भंगार बाजाराकडे बघितले जाते. कारण, येथे वस्तूंसोबतच जुने कपडेही मिळतात. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस महिला काचेची बरणी, जर्मनचे गंज, स्टीलची भांडी तसेच प्लास्टीक बकेट, टोपले आदी डोक्यावर घेऊन शहरभर फिरतात. जुन्या साड्या, शर्ट, फुलपॅंटच्या मोबदल्यात नवीन भांडे देतात. पैसे घेत नाहीत. जुन्या कपड्यांत भांडे मिळतील, हे त्यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य असते. यामुळे भांडी देत अधिकाधिक जुने कपडे मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. टाकाऊ, फाटक्या कपड्यांना धुऊन, इस्त्री करून, सुईदोऱ्याने शिवून हे कपडे विकण्याजोगे करतात. मग या चिंधी बाजारात सजविले जातात. यांच्या जगण्याचं आॅडिट केलं तर चिंध्या चिंध्या झालेलं भुके कंगाल आयुष्यच शिल्लक उरतं.  

हेही वाचलेच पाहिजेरेडिमेडची समाजमनावर अशीही मोहिनी : कशी ते वाचा

झोपडपट्टीत राहणाराच खरा ग्राहक
दर रविवारी नांदेडमध्ये भरणारा हा बाजार गरिबांच्या गर्दीने फूलन जातो. पाच, दहा आणि पंधरा रुपयांत येथे घालण्यास योग्य कपडे मिळतात. यामुळेच रिक्षाचालकापासून तर झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांच्या नजराही या बाजारावर असतात. अलिकडे मध्यमवर्गीयही या बाजारात येवून वस्तूंसह कपडे खरेदी करताना दिसतात.  रंगीबेरंगी कपडे विक्रीवर जास्त भर असतो. चांगले कपडे आले की, शंभर रुपयात पाच जीन्स विकत घेणारे ग्राहकही या बाजारात दिसतात. अशी एक नव्हे तर शेकडो महिला आणि पुरुष येथे जुन्या वस्तू आणि कपड्यांचे दुकान थाटून बसलेले दिसतात.

Image may contain: 3 people, people sitting, shoes and outdoor
टीव्ही रिमोटसह इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे दालन (छायाचित्र ः मुनवर खान)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Market Meeting the Needs of the Poor: The Market for Which and Where