फक्त पाच लाख द्या, वधूच आणून देतो!

Marriage
Marriage

औरंगाबाद - बंगला, कार, पैसाअडका आहे; पण लग्नच जुळत नाही, अशा लोकांची संख्या सर्वच जाती, समाजांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे आपसूकच अशा लोकांना फसविणाऱ्यांचेही चांगलेच फावत आहे. तीन ते पाच लाख रुपये घेऊन उपवर मुलांसाठी वधू मिळवून देण्याचा गोरखधंदा करणाऱ्यांनी शहरातील अनेकांना गंडविल्याचे समोर आले आहे.

विवाह नोंदणीसाठी तीन ते पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या फसव्या वधू-वर सूचकांच्या रॅकेटचा ‘सकाळ’मधून पर्दाफाश होताच अनेकांनी फोन, मेसेज करून आपबीती कथन केली. त्यातून एकेक धक्कादायक प्रकार उघड झाले. कुणाला लाख, तर कुणाला पाच लाख रुपयांना गंडा घातला गेल्याचे किस्से वाचकांनी ऐकविले.

जातीत मुलगी मिळत नाही, कुणाची खर्चाची ऐपत नाही, कुणाला काही व्यंग आहे तर कुणाकडे विवाह जुळविण्याचा ‘उद्योग’ करणारे कुणी कर्तेधर्ते नाहीत. अशा अनेक समस्यांवर ‘आम्ही विवाह जुळवून देतो’, ‘चांगली मुलगी मिळवून देतो’ अशी आमिषे दाखविणाऱ्या ‘उद्योगी’ लोकांचे फावले आहे. ‘तुमच्या जातीतले स्थळ जुळवून देऊ’ अशी ठाम खात्रीही दिली जाते. कित्येक विवाहेच्छुक या प्रकारांना बळी पडले आहेत.

विकतच्या वधूनेही घातला गंडा
एजंटला तीन ते पाच लाख रुपये मोजून घरी आणलेली ‘लक्ष्मी’ काही दिवस नांदून, विश्‍वास संपादन करून नंतर घरातला मुद्देमाल घेऊन फरार झाल्याचेही प्रकार घडले आहेत. गेल्या काही वर्षांत यातील मोजकीच प्रकरणे पोलिसांपर्यंत आली. अनेकांनी मात्र बेअब्रूच्या भीतीपोटी गुपचिळी धरल्याचे विवाहसूचक मंडळांकडून कळाले. अनाथाश्रमातून पळविलेल्या किंवा अपहरण करून आणलेल्या मुलींचाही व्यापार या माध्यमातून होत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

आम्ही गेली २५ वर्षे वधू-वर सूचक केंद्र चालवतो. आमच्याकडे येणाऱ्या काही विवाहेच्छुकांनी असे प्रकार घडल्याचे सांगितले. त्यातील काहींच्या बाबतीत असा प्रकार घडून चुकला होता. अधिकृत संकेतस्थळ, पत्ता नसेल, अशा एजंटांपासून सावध राहिले पाहिजे.
- डॉ. अनिल कौसडीकर, भावबंधन वधू-वर सूचक केंद्र.

अशा प्रकारांत कुणी अडकू नये. कुणाच्या बाबतीत असा प्रकार घडत असेल, तर तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नावानिशी तक्रार देण्याची इच्छा नसेल, तर निनावी तक्रारही देऊ शकता. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
-डॉ. दीपाली घाडगे, पोलिस उपायुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com