जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाजणार सनई-चौघडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर लवकरच समाजाभिमुख होणार आहे. यासाठी लातूर ऑफिसर्स क्‍लब मैलाचा दगड ठरणार असून, खेळ व मनोरंजनापुरतेच मर्यादत न राहता क्‍लब आता लग्न; तसेच विविध कार्यक्रमासाठी विस्तारित लॉनही उभारणार आहे. या लॉनवर लग्न, अन्य समारंभ होणार असून यासाठीच्या शुल्कात क्‍लबच्या आजीवन (कायम) सदस्यांना पन्नास टक्के सूटही देण्यात येणार आहे.

लातूर : बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर लवकरच समाजाभिमुख होणार आहे. यासाठी लातूर ऑफिसर्स क्‍लब मैलाचा दगड ठरणार असून, खेळ व मनोरंजनापुरतेच मर्यादत न राहता क्‍लब आता लग्न; तसेच विविध कार्यक्रमासाठी विस्तारित लॉनही उभारणार आहे. या लॉनवर लग्न, अन्य समारंभ होणार असून यासाठीच्या शुल्कात क्‍लबच्या आजीवन (कायम) सदस्यांना पन्नास टक्के सूटही देण्यात येणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात येत्या काळात सनई चौघड्याचे सूर ऐकू येणार आहेत. 

क्‍लबचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता. पाच) ही माहिती दिली. क्‍लब सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती. श्रीकांत म्हणाले, ""क्‍लबच्या इमारतीचे बांधकाम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर एका बड्या क्रिकेटपटूच्या हस्ते क्‍लबचे उद्‌घाटन होणार आहे. दोन महिन्यांत अंतर्गत सजावट व आवश्‍यक वस्तूंची खरेदी होणार आहे.

शहरात मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालये असली तरी त्यांच्याकडे खेळांच्या सुविधा नाहीत. शाळा व महाविद्यालयांना माफक शुल्कात क्‍लबमध्ये खेळ तसेच अन्य सुविधा देण्यात येणार आहे. यातून क्‍लबला वेगळे उत्पन्न मिळून सदस्यांच्या वार्षिक शुल्कात वाढ करण्याची गरज भासणार नाही. 
श्रीकांत यांनी क्‍लबच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडला.

इमारत बांधकामासोबत आवारातील विहिरीचे केलेल्या पुनरुज्जीवनाची माहिती दिली. तांत्रिक स्थापत्य सल्लागार कृष्णकुमार बांगड यांनीही माहिती सादर करत जमाखर्चाही सांगितला. पहिल्यांदा सदस्य झालेल्या दहा सभासदांना श्रीकांत यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप झाले. 

श्रीकांत आजीवन सदस्य 
क्‍लबच्या काही ज्येष्ठ सदस्यांनी श्रीकांत यांनी क्‍लबचे आजीवन सदस्यत्व स्वीकारावे, अशी मागणी केली. भविष्यात त्यांची बदली झाली तरी यानिमित्ताने त्यांची लातूरशी नाळ कायम राहील, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. त्यानंतर आपण आजीवन सदस्यत्व स्वीकारणार असल्याचे श्रीकांत यांनी जाहीर केले. लातूरच्या ज्येष्ठ पत्रकारांनाही अधिकाऱ्यांप्रमाणे शुल्क आकारून क्‍लबचे सदस्यत्व देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगतानाच मोठ्या संख्येने क्‍लबचे सदस्यत्व स्वीकारावे; तसेच सध्याच्या सदस्यांनी आणखी किमान एकाला तरी सदस्यत्वासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage ceremony can be organize in the District Collector office area