खर्चाला फाटा, ना घोडा ना गाजावाजा

खर्चाला फाटा, ना घोडा ना गाजावाजा

औरंगाबाद - मुला-मुलीची पसंतीही झाली अन्‌ लगेचच लग्नाची लगबग सुरू झाली. चोवीस तासांत लग्नही उरकले. ना हुंडा, ना मानपान. एवढेच नाही, तर लग्नात मंडप आणि कसलाही गाजावाजा नाही. आई-वडिलांविना पोरकी कर्नाटकातील दत्तक मुलगी सून म्हणून स्वीकारत औरंगाबादच्या सहायक पोलिस आयुक्तांनी खर्चाला फाटा देत एक आदर्श घालून दिला.

औरंगाबादेत गतवर्षी ११ मे रोजी झालेल्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिवाची बाजी लावणारे सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सामाजिक भानही जपले. एक मुलगा सीमेवर शत्रूशी दोन हात करीत असताना वकील असलेला दुसरा मुलगा सचिन याच्या लग्नासाठी स्थळ बघणे सुरू होते. इचलकरंजी येथील महादेवी पाटील यांच्याकडील एका स्थळाची माहिती त्यांना व्याही दिलीप अग्रहारकर यांच्याकडून मिळाली. श्रीमती पाटील यांच्याशी गोवर्धन कोळेकरांनी मुलाच्या लग्नाबाबत संपर्क साधला. त्यावेळी मुलगी रेणुका तल्लूर हिला आई-वडील नाहीत. तिला दत्तक घेतले आहे, असे श्रीमती पाटील यांनी सांगताच कोळेकरांनी फोनवरच लग्नासाठी होकार दिला. शनिवारी (ता. २३) मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम अग्रहारकर कुटुंबीयांकडे पार पडला. दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी (ता. २४) विवाहही अगदी साध्या पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे ज्यांना या लग्नाची माहिती समजली, ते निमंत्रणाविनाच तेथे पोचले. लोकप्रतिनिधींचाही यात समावेश होता.

एका विवाहाने चार कुटुंबे एकत्र
रेणुका तल्लूर मूळची नेगीनहाळ (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) येथील असून, तिचे पालकत्व इचलकरंजीच्या महादेवी पाटील यांनी स्वीकारले. लग्नात तिचे पालकत्व कोळेकर यांचे व्याही दिलीप व शैला अग्रहारकर यांनी स्वीकारत कन्यादान केले. एका विवाहामुळे कोळेकर, तल्लूर, अग्रहारकर आणि पाटील कुटुंबीयांत नात्याची वीण बांधली गेली.

दत्तक मुलगी रेणुका हिला स्वीकारताना आनंद होतोय. खर्चाला फाटा देत गाजावाजा न करता मुलगा सचिनसोबत लग्न लावले. मला अभिमान आहे या गोष्टीचा. अशाच प्रकारे समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. आतापर्यंत महादेवी पाटील यांनी मुलीचे मातृत्व स्वीकारले होते. आता आम्ही ते स्वीकारत आहोत.  
- गोवर्धन कोळेकर, सहायक आयुक्त.

रेणुका व तिची मोठी बहीण नागरत्ना यांचे पालकत्व स्वीकारून सांभाळ केला. नागरत्नाचे लग्न लावून दिले. रेणुकाला शिकवून नोकरीला लावले. ती कोल्हापूरच्या एसटी विभागात क्‍लार्क आहे. वाटलं नव्हतं की, एका दिवसांत नव्हे तर एका तासात हा विवाह सोहळा जुळून येईल. खूप समाधान वाटते.
- महादेवी पाटील, मुलीची आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com