esakal | सोलापूरच्या अल्पवयीन मुलीचे जालन्यात लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद केली असताना सोलापूर येथील अल्पवयीन मुलीचे बीड येथील एजंटामार्फत जालना शहरातील एसटी कॉलनी येथे एका ३० वर्षीय मुलासोबत लग्न लावून दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवासह लग्न लावून देणाऱ्या पुरोहितालाही ताब्यात घेतले आहे.  

सोलापूरच्या अल्पवयीन मुलीचे जालन्यात लग्न

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद केली असताना सोलापूर येथील अल्पवयीन मुलीचे बीड येथील एजंटामार्फत जालना शहरातील एसटी कॉलनी येथे एका ३० वर्षीय मुलासोबत लग्न लावून दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी नवरदेवासह लग्न लावून देणाऱ्या पुरोहितालाही ताब्यात घेतले आहे. तर महिला एजंटसह मुलीचे मामा-मामी फरारी झाले आहेत. दरम्यान, हे रॅकेट मोठे असल्याचा अंदाज आहे. 

सोलापूर येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. या मुलीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण घरातीला सदस्यांना लागली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीला सोलापूर येथून बीड येथील तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी आणले गेले. मामा-मामीच्या सहमतीने मोठ्या बहिणीच्या बीड येथील घराजवळील एका महिला एजंटमार्फत या अल्पवयीन मुलीचा विवाह जालना शहरातील एसटी कॉलनी येथील वल्लभ कुलकर्णी या ३० वर्षीय मुलासोबत आर्थिक व्यवहार करून ठरविण्यात आला. त्यानंतर रविवारी (ता.पाच) या अल्पवयीन मुलीचे एसटी कॉलनी येथील वल्लभ कुलकर्णी याच्या घरी लग्न लावून देण्यात आले.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, या मुलीने तिच्या मित्राशी मोबाईलवरून संपर्क करून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या मुलाने या अल्पवयीन मुलीला येथील बालकल्याण समिती तसेच पोलिस अधिकाऱ्यांचा नंबर दिला.

हेही वाचा :  कोरोनामुळे साखर कारखाने गोत्यात

या अल्पवयीन मुलीने पोलिसांसह बालकल्याण समितीशी संपर्क साधल्यानंतर जालना कदीम पोलिसांनी या अल्पवयीन मुलीची वल्लभच्या घरातून सुटका केली. तसेच नवरदेव वल्लभ व लग्न लावून देणारा पुरोहित सुमित कुलकर्णी या दोघांना पकडले आहे. दोनही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, बालकल्याण समितीने या मुलीची वसतिगृह येथे रवानगी केली आहे. 

मोठे रॅकेट असण्याची शक्यता

अल्पवयीन मुलींची विक्री करून त्यांचा विवाह लावून देणारे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. कारण सोलापूर येथील अल्पवयीन मुलीचे बीड येथील महिला एजंटमार्फत जालना शहरात लॉकडाउनच्या काळात लग्न लावून देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास या रॅकेटच्या मुळाशी गेला तर अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे. 

सीमा बंद असताना प्रवास केलाच कसा

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. असे असताना सोलापूर जिल्ह्यातून बीड शहरात आणि बीड जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलीला घेऊन कसे आले? एकाही चेकपोस्टवर पोलिसांकडून विचारणा झाली नाही काय? यांच्याकडे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा परवाना होता का? तो पोलिसांनी तपासला काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.  

या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले आहे. या मुलीला बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. या मुलीचा ताबा मागण्यासाठी मुलीची मोठी बहीण व आजी बालकल्याण समितीपुढे आल्या होत्या. त्यांनी या अल्पवयीन मुलीच्या लग्नाच्या बदल्यात बीडच्या एजंट महिलेने ३५ हजार रुपये दिल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तापस करीत आहेत. 
- अ‍ॅड. संजय गव्हाणे, 
प्रोसिडिंग ऑफिसर, बालकल्याण समिती सदस्य.

(संपादन : संजय कुलकर्णी)