आहेर नको, अनाथालयाला मदत करा

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 8 जानेवारी 2019

औरंगाबाद - लग्नसोहळ्यात आहेर आणि पुष्पगुच्छांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून अनाथालयाला मदत करण्याचा आदर्श उपक्रम शहरातील ॲड. मयूर सोळुंके आणि ऋतुजा पाटील यांनी घालून दिला. त्यांच्या विवाह आणि स्वागत समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींनी दिलेल्या रकमेतून ‘बालग्राम’ला एक लाख रुपयांचा मदतनिधी उभा राहिला.

शहरातील ज्येष्ठ वकील वसंतराव साळुंके यांचा मुलगा ॲड. मयूर आणि रेणापूर (जि. लातूर) येथील आनंदराव पाटील यांची कन्या ऋतुजा हे नुकतेच विवाहबद्ध झाले. लग्नसोहळ्याला आणि रविवारी (ता. सहा) झालेल्या स्वागत समारंभाला आलेल्या पाहुण्यांनी सोबत वधुवरांसाठी आहेर, पुष्पगुच्छ आणू नये; पण गेवराई (जि. बीड) येथील सहारा अनाथालय परिवार, बालग्रामला रोख स्वरूपात मदत करावी, असे आवाहन लग्नपत्रिकेतून केले. एवढ्यावरच न थांबता थेट मंगल कार्यालयातच मदतनिधी स्वीकारण्यासाठी ‘बालग्राम’चा स्टॉलच लावला. सोळुंके यांच्या नातेवाईक आणि आप्तस्वकीयांनी या संकल्पनेला भरभरून दाद देत भेट रक्कम तेथे जमा केली. यातून तब्बल एका लाख रुपयांचा निधी उभा राहिला.

आहेर आणि पुष्पगुच्छ यांच्यात वाया जाणाऱ्या पैशांचा अपव्यय टाळून चांगल्या कामासाठी तो पैसा वापरला जावा, असे आम्हाला वाटले. आम्हीच अशी काही सुरवात केली, तर बाकीच्यांसाठी चांगला पायंडा पडेल. सर्वांनी या प्रकारे विचार केल्यास बदल घडविणे अवघड नाही.
- ॲड. मयूर आणि ऋतुजा

Web Title: marriage No Gift Help to Orphanage Motivation Mayur Solunke