हळद उतरायच्या आधीच ती झाली विधवा ; नवऱ्याचा अपघातात मृत्यू

दिलीप दखने
बुधवार, 9 मे 2018

नवरीमुलगी अश्विनी ही या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. दुधाच्या गाडीतून जात असलेले शिवकुमार ओमप्रकाश अंबाला, नितेश सुरेशकुमार,शहाजी नानासाहेब लांडगे, मच्छिंद्र साहेबराव कुबेर हे जखमी झाले आहेत.

वडीगोद्री : अवघ्या पाच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर देवदर्शनासाठी निघालेल्या नवरदेवाच्या गाडीचा औरंगाबाद-सोलापूर महामार्गवरील डोमेगाव फाटा येथे बुधवारी (ता.9) अपघात झाल्याने नवरदेवासह अन्य एका महिलेचा मृत्यू झाला.

अंबड तालुक्यातील खेडगाव येथे अमित गोडसे आणि अश्विनी या दोघांचा ता. चार मे रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर बुधवारी (ता.9) पंढरपूरला देवदर्शनासाठी हे दांपत्य निघाले होते. अंबड तालुक्यातील डोमेगाव फाट्याजवळ नवरदेवाच्या बोलेरो आणि दुधाच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये बोलेरो गाडीतून जात असताना वर अमित गोडसे आणि त्यांची मावस बहीण वंदना चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.

नवरीमुलगी अश्विनी ही या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. दुधाच्या गाडीतून जात असलेले शिवकुमार ओमप्रकाश अंबाला, नितेश सुरेशकुमार,शहाजी नानासाहेब लांडगे, मच्छिंद्र साहेबराव कुबेर हे जखमी झाले आहेत.

या सगळ्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असतानाही तब्बल चार तासांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Before marriage she was become widow