विवाहितेचा कटरने कापला गळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुनंदा शिवाजी (ऊर्फ प्रमोद) वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. 

औरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुनंदा शिवाजी (ऊर्फ प्रमोद) वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. 

तिचा सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी शिवाजीसोबत विवाह झाला होता. त्यांना सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, पती मद्याच्या आहारी गेल्याने त्यांच्यात वाद होऊन ती जाधववाडी येथे माहेरी राहण्यास आली. तिथे काही महिने राहिल्यानंतर ती हडको परिसरात राहण्यास आली. तेथून १५ दिवसांपूर्वी ती टीव्ही सेंटर येथे सातबाय आठच्या एका खोलीत राहण्यास आली. 

तिने धुणीभांडी करण्याचे काम हाती घेतले. तिला भेटण्यासाठी संशयित शुभम भाऊसाहेब बागूल (वय ३२) सतत येत असे. गुरुवारी तो सुनंदाच्या घरी आला होता. त्यावेळी मुले शाळेत गेलेली होती. दोघांमध्ये काही वाद झाला. भांडण विकोपाला गेल्याने त्याने कटरने तिचा गळा खोलवर चिरला. जिवाच्या आकांताने तिने आरडाओरड करताच तो घरातून पसार झाला. सुनंदाच्या मुलीने पोलिसांना सांगितले, की शुभम आमच्या घरासमोरील मंदिराजवळ काही दिवसांपासून येत होता. तिथेच बराच वेळ वाट पाहायचा. अशीच माहिती शेजाऱ्यांनीदेखील सांगितली.

वाटेतच गेला जीव
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनंदाला रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी रिक्षा बोलावली; पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने शुभमने खुनात वापरलेले कटर, हातातील बॅंड व हेडफोनचे टोक जप्त केले.

अन्‌ तिला रडू कोसळले
सुनंदा नेहमी मुलीला शाळेतून आणण्यासाठी जायची. सायंकाळचे सव्वापाच वाजले तरीही आई घ्यायला आली नाही. त्यामुळे ती वाट पाहत होती; पण आईच कायमचा निरोप घेऊन गेल्याचे कळाल्यानंतर मुलगी धास्तावली अन्‌ तिला रडू कोसळले.

रक्ताने माखलेल्या हातात बेड्या
सुनंदा वाघमारे हिचा खून करताच संशयित शुभम बागूल कटर जागीच टाकून पसार झाला. शेजारीच राहणाऱ्या संशयित मारेकऱ्याच्याच नातलगाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

पोलिसांनी शुभमचा शोध सुरू केला असता तो शताब्दीनगर येथे असल्याचे एकाने सांगितले. यानंतर गुन्हेप्रगटीकरण शाखेसह पोलिसांनी रक्ताने माखलेल्या त्याच्या हातात बेड्या टाकल्या. यावेळी त्याने आवेशात खून केल्याची कबुली दिली; पण नंतर तो नरमला. त्याला सिडको ठाण्यात आणण्यात आले. त्याची गुन्हेशाखा व सिडको पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी तो नशेत असल्याचा अंदाज पोलिसांना आला. 

मृत सुनंदाच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित शुभमविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, मधुकर सावंत, उपनिरीक्षक भारत पाचोळे, नरसिंग पवार, इरफान खान, संतोष मुदिराज, प्रकाश डोंगरे, किशोर गाढे यांनी केली.

मुलीसमक्ष दिली होती धमकी
‘शुभम दोन दिवसांपूर्वी घरी आला होता. तो शेजाऱ्यांशी आणि आईसोबत भांडला. आईने पोलिस ठाण्यात तक्रार करेल, असे सांगताच त्याने धारदार वस्तू काढली. आईच्या गळ्याभोवती लावली. पोलिस माझे काहीही बिघडू शकत नाही, आधीच मी जेलमध्ये जाऊन आलो. असे सांगून तो निघून गेला,’ अशी माहिती मृत सुनंदाच्या मुलीने पोलिसांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.

शुभम गुन्हेगारी प्रवृत्तीचा
संशयित शुभम गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध वर्ष २०१३ ला जबरी चोरीचा, वर्ष २०१४ ला विनयभंग व बाललैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार, तर वर्ष २०१६ मध्ये पुन्हा विनयभंगाच्या गुन्ह्याची पोलिस ठाण्यात नोंद आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Married Woman Murder Crime