होय, मंगळावर जीवसृष्टी शक्‍य 

Mars Orbiter
Mars Orbiter

औरंगाबाद : 'मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम)' अंतर्गत इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) मंगळयानाचे पाच नोव्हेंबर 2013 ला यशस्वी लॉंचिंग केले.

कमीत कमी वेळेत आणि खर्चात मंगलयान लॉंच करून इस्रोने इतिहास निर्माण केला. नासा आणि मंगळयानाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती. भविष्यात जीवसृष्टी अस्तित्वात येण्याची शक्‍यता आहे, असा आशावाद मॉमच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्‍टर रितू करिधाल यांनी एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्‍त केला. 

त्या तापडिया नाट्यमंदिरात आस्था फाउंडेशन आणि सीएमआयएतर्फे आयोजित 'यशवंत इन्स्पिरेशन टॉक सिरीज'मध्ये शनिवारी (ता. 25) बोलत होत्या. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मॉमबद्दल बोलताना श्रीमती करिधाल म्हणाल्या, की मंगळयानाचे लॉंचिग करण्यासाठी ठराविक कोन आणि अंतर असावे लागते. त्यासाठी आम्हाला केवळ 18 महिन्यांचा कालावधी मिळाला होता. आतापर्यंत भारताने अंतराळाशी संबंधित 51 मिशन केले होते. त्यापैकी 21 मिशन यशस्वी झाले. मिशन यशस्वी होण्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांहून कमी होते. त्यातही पहिल्याच प्रयत्नात मिशन फत्ते झाल्याचे प्रमाण नगण्य होते. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करायचे होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून केवळ साडेचारशे कोटी रुपये खर्च करून मंगळयानाचे यशस्वी लॉंचिंग झाले होते. फ्युअल टॅंक, कम्युनिकेशन सिस्टीम आणि ट्रॅजेक्‍टरीत स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराने हा खर्च इतरांच्या तुलनेत दहा पटींनी कमी होता. याप्रकारचा पूर्वी कधीही अनुभव गाठीशी नसताना पहिल्याच प्रयत्नात लॉंचिग करून जागतिक स्तरावर इतिहास निर्माण केला. ही संधी हुकली असती तर मंगलयान लॉंच करण्यासाठी तब्बल 26 महिने वाट पाहावी लागली असते. मात्र, इस्रोच्या तरुण शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नामुळे इतिहास निर्माण झाला. 

जीवसृष्टी असल्याचे संकेत 

पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 365 दिवस लागतात. त्याप्रमाणे मंगळाला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागतात. आता मंगळयानाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यादरम्यान इस्रोकडे मोठ्या प्रमाणात माहिती जमा झालेली आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी, वेगवेगळे हवामान, वातावरणात कार्बन आणि अमोनिया यांसह जीवसृष्टी असल्याचे स्पष्ट आहे. मंगळावर यापूर्वी जीवसृष्टी असू शकते, भविष्यात या ठिकाणी जीवसृष्टी निर्माण होऊ शकते. येणाऱ्या काळात याबाबत अधिक स्पष्टता येईल. 

मंगळच का, शुक्र का नाही? 
मंगळाऐवजीच शुक्र ग्रहावर उपग्रह का सोडण्यात नाही आला? या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्रीमती करिधाल म्हणाल्या, की मंगळ ग्रहावर पृथ्वीशी साम्य असलेले गुणधर्म आढळतात. त्याउलट शुक्र ग्रहावर असह्य वातावरण, सूर्याच्या जवळ असल्याने भयंकर तापमान आणि विषारी वायूंचा वावर आहे. त्यामुळे शुक्राऐवजी मंगळाचीच निवड करण्यात आली. भविष्यात गरज भासल्यास शुक्र ग्रहाचेही संशोधन केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com