#MarthaKrantiMorcha वडिलांचे पैशासाठी नव्हे, मराठा समाजासाठी बलिदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

देवगाव रंगारी - आमचे वडील जगन्नाथ सोनवणे यांनी पैशासाठी नव्हे, तर मराठा समाजासाठी बलिदान केले आहे. त्यांच्या आत्महत्येचा आंदोलनाशी संबंध नसल्याचा अपप्रचार केला जात असून, हे ऐकून आम्ही व्यथित झालो आहोत, अशी भावना व्यक्त करून भरत सोनवणे व भगवान सोनवणे या मुलांसह कुटुंबीयांनी शिवसेनेतर्फे देण्यात आलेली आर्थिक मदत नाकारली.    

येथील आत्महत्या केलेल्या जगन्नाथ सोनवणे यांच्या कुटुंबीयाचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी सांत्वन केले. यावेळी शिवसेनेतर्फे देऊ केलेली मदत सोनवणे परिवाराने नाकारत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी केली. यावेळी सोनवणे यांच्या घराजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी श्री. खैरे यांच्यासोबतजिल्हाप्रमुख अंबादास दानवे, संपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचे श्री. खैरे यांनी भारत सोनवणे, भगवान सोनवणे यांच्यासह कुटुंबीयास सांगितले. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने जगन्नाथ सोनवणे यांच्या मृत्यूचा आंदोलनाशी संबंध नसल्याचे पत्रक काढले. हा आमच्या वडिलांचा अपमान असून, त्यांनी पैशासाठी नव्हे, तर समाजासाठी बलिदान केल्याचे मुलगा भगवान सोनवणे यांनी सांगितले. समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्री. खैरे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून योग्य अहवाल देण्यास सांगितले.

शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारू असे श्री. दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. अण्णा शिंदे, राजकुमार गंगवाल, सुभाष सोनवणे, ललित सुरासे, जनार्दन बरबंडे, प्रभाकर नाईक आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: #MarthaKrantiMorcha maratha reservation jagannath sonawane agitation