उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचे धरणे आंदोलन

राजेंद्रकुमार जाधव
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

उस्मानाबाद - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 13) धनगर समाजातील नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात धनगर समाज महासंघप्रणित मल्हार सेनेसह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सकाळी साडेअकरापासून या आंदोलनाला सुरवात झाली आहे. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष आरक्षण देण्यासाठी चालढकल करीत असल्याबद्दल समाजातील प्रमुखांनी यावेळी भाषणामध्ये तीव्र संताप व्यक्त केला. आरक्षणासाठी औरंगाबाद येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समाजातील नेत्यांनी यावेळी केले. 

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजातील नागरिकांनी शासनाचा निषेध करीत गावातून फेरीही काढली होती. मुरुम (ता. उमरगा) येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. कसबेतडवळे (ता. उस्मानाबाद) येथे बंद पाळून लातूर- बार्शी मार्गावर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तुरोरी (ता. उमरगा) येथे धनगर समाजाच्या वतीने बाजारपेठे बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mass Agitation of citizens in Osmanabad district collector office