अडीच हजार उत्तरपत्रिकांतूनही शोधणार 'मास कॉपी'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

औरंगाबाद - साई अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू सत्रात झालेल्या परीक्षेतील सर्वच म्हणजे दोन हजार 321 उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. तज्ज्ञांमार्फत हा "मास कॉपी'चा प्रकार आहे का, हेदेखील तपासून पाहणार आहे. दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच त्या 26 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने चार परीक्षांना त्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी गुरुवारी (ता. 18) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 26 विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. 17) नगरसेवकाच्या घरात परीक्षा देताना पोलिसांनी पकडले. यात विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,' असे नेटके म्हणाले. प्राचार्यांना वेतनाव्यतिरिक्‍त परीक्षांसाठी कस्टोडियन म्हणून मानधन देण्यात येते; तर या गैरप्रकाराला तेही तेवढेच जबाबदार आहेत.

डॉ. नेटके म्हणाले, की पोलिस कारवाईशिवाय साई अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या परीक्षेतील 2 मे ते 13 मेपर्यंत नऊ दिवसांत विविध विषयांच्या दोन हजार 321 उत्तरपत्रिका विद्यापीठ ताब्यात घेणार आहे. त्याचे व्हेरिफिकेशन दोन दिवसांत करण्यात येईल. त्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात येणार आहे. त्यात "मास कॉपी' तपासली जाईल. त्याचे रिपोर्ट कुलगुरूंना देण्यात येतील. त्यानंतर "मास कॉपी'चा प्रकार आढळल्यास त्या विद्यार्थ्यांवर 1994 च्या विद्यापीठ कायद्यातील 32 (6) नियमानुसार समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर एक ते चार परीक्षांची बंदी विद्यापीठ घालू शकते.

कुलगुरू दुसऱ्या दिवशीही दिल्लीतच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाकर्तेपणा पोलिसांनी मंगळवारी (ता. 16) रात्रीच उजेडात आणला. त्यानंतर बुधवारी दिवसभर या बातमीने राज्यभरात खळबळ माजली. मात्र, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दिल्लीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदाच्या मुलाखतीत व्यग्र होते. ते कुणाच्याच फोन कॉललाही उत्तर देत नव्हते. गंभीर प्रकरण असल्याचे संदेश गेल्यानंतर रात्री उशिरा याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. डॉ. चोपडे गुरुवारी (ता. 18) सकाळीच औरंगाबादेत येतील असे जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले; मात्र रात्री नऊ वाजले तरी कुलगुरू शहरात दाखल झाले नव्हते. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देण्यासाठी येथील एकही अधिकारी पुढे आला नाही.

"बैठ्या पथका'ची घोषणा हवेतच
साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षेतील गैरप्रकार वारंवार उघडकीस आल्यानंतर कुलगुरूंनी अभियांत्रिकीचे "होम सेंटर' रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दबाव आणल्यानंतर वीस दिवसांपूर्वीच घेण्यात आलेला निर्णय फिरवला होता. त्या वेळी माध्यमांची बोळवण करताना अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमले जाईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केली होती. ती घोषणाही या प्रकाराने हवेतच विरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'सेम डे कलेक्‍शन'चा निर्णय
विद्यापीठाकडून यापूर्वी पेपर जमा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी परीक्षा केंद्रांना दिला जात होता. आता उत्तरपत्रिकांचे परीक्षा झालेल्या दिवशीच संकलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांत अभियांत्रिकीची 21 केंद्रे आहेत. औरंगाबादेत 14, जालना एक, बीड तीन आणि उस्मानाबाद तीन अशी केंद्रे आहेत. यासोबतच फार्मसी, आर्किटेक्‍ट विषयांचे मिळून 29 केंद्रे आहेत. अभियांत्रिकीसोबत इतरही अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका "सेम डे'ला कलेक्‍शन करण्याचा प्रयत्न राहील, असे डॉ. नेटके यांनी सांगितले.

जुन्या कायद्यानुसार कारवाई
साई अभियांत्रिकीत 2 ते 13 ते दरम्यान झालेल्या परीक्षेच्या दोन हजार 321 उत्तरपत्रिका विद्यापीठाने मागवल्या आहेत. विषय तज्ज्ञांमार्फत त्यात "मास कॉपी' झाली का, ते तपासले जाईल. त्यानंतर 1994 च्या विद्यापीठ कायद्यानुसार प्रमाद समितीचे 32 (6) हिंदी विभागाचे डॉ. संजय नवले आहेत. "मास कॉपी' आढळल्यास चारसदस्यीय समिती विद्यापीठ नियमानुसार त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करेल.

मला पदाचा मोह नाही. वेगवेगळे आरोप केले जात आहेत. मी जर पैसे घेतले असतील तर पुरावे दाखवा.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक

Web Title: mass copy searching in 2500 answer sheet