व्हॉट्‌सॲप ग्रुपवरून जुळताहेत संसार

तुकाराम शिंदे
शुक्रवार, 29 जून 2018

तीर्थपुरी - राज्यातील कुंभार समाजातील वधू-वरांना व्हॉट्‌सॲप ग्रुपचा पुरेपूर उपयोग झाला. या ग्रुपच्या माध्यमातून नवीन तसेच विविध कारणांनी मोडलेले संसार पुन्हा नव्याने जुळून आले आहेत. 

तीर्थपुरी - राज्यातील कुंभार समाजातील वधू-वरांना व्हॉट्‌सॲप ग्रुपचा पुरेपूर उपयोग झाला. या ग्रुपच्या माध्यमातून नवीन तसेच विविध कारणांनी मोडलेले संसार पुन्हा नव्याने जुळून आले आहेत. 

राज्यातील विविध जिल्ह्यांत वधू-वर विवाहमंडळ, घटस्फोटित व विधवा असे विविध व्हॉट्‌सॲप ग्रुप सुरू करण्यात आल्याने आतापर्यंत एक हजाराच्यावर विवाह जुळून आले. विशेषतः नववधू-वरांबरोबर घटस्फोटित व विधवा यांचेही मोठ्या प्रमाणात विवाह जुळून येत आहेत. पूर्वी विवाह नोंदणी मासिकातून होत होती; परंतु हे मासिक सर्वत्र पोहचत नसल्याने तसेच पूर्वी मोबाईलची सोय उपलब्ध नसल्याने अडचण होत होती. नाशिक येथील गंगाधर जोर्वेकर यांनी समाजातील वधू-वरांची मासिकाच्या व नोंदवहीच्या माध्यमातून संपर्क करून विवाह जुळविण्याचे काम समाजबांधवांच्या मदतीने निःस्वार्थपणे सुरू केले. राज्यातील विविध जिल्ह्यांत वधू-वर विवाहमंडळ ग्रुप सुरू केले. या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील तरुण एकत्र आल्याने वधू-वरांचे विवाह जुळून आले. 

समाजातील विविध कारणांनी घटस्फोटित झालेले तरुण-तरुणी तसेच विधवा यांना या ग्रुपचा मोठा फायदा झाला आहे. या माध्यमातून अनेकांचे मोडलेले संसार नव्याने जुळून आले. नववधू-वर व इतर असे एकूण यंदा चारशे छप्पन्न विवाह जुळून आले. दरम्यान, योगेश चित्ते म्हणाले, की बहिणीच्या पुनर्विवाहासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. व्हॉट्‌सॲप ग्रुपमुळे वराची माहिती मिळाली. त्यामुळे बहिणीचा विवाह लवकर करता आला.

शहरी भागातील वधू-वर मेळाव्यात ग्रामीण भागातील वधू-वर सहभागी होत नसत. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून वधू-वरांचे नि:स्वार्थपणे विवाह जुळवून देण्याचे काम करीत होतो. ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजाराच्यावर विवाह जुळून आले आहेत.
- गंगाधर जोर्वेकर, व्हाट्‌सॲप ग्रुपचालक

Web Title: Matching the marriage on Whatsapp group