
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १४) लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व एमआयडीसी येथे लाक्षणिक संप करण्यात आला.
लातूर : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १४) लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व एमआयडीसी येथे लाक्षणिक संप करण्यात आला. त्यामुळे येथील व्यवहार ठप्प होते. कोरोना काळात मरण पावलेल्या माथाडी कामगारांना ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, माथाडी मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा आदी मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने राज्यभर सोमवारी लाक्षणिक संपाचा इशारा देण्यात आला होता.
त्याचा एक भाग म्हणून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती व एमआयडीसी भागात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लातूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक बंद पाळण्यात आला. यामुळे कामकाज ठप्प राहिले. या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव, दिलीप कांबळे, जिल्हा सचिव माणिक पाडोळे, जीवन भालेराव, त्र्यंबक गोडबोले, महादेव धनवे, आत्माराम कांबळे, ज्योतीराम गरड, उद्धव पाडोळे, लक्ष्मण शेळके, सचिन चिकाटे, अमोल कांबळे, एमआयडीसी शाखेचे अध्यक्ष दयानंद खंडागळे, धोंडीराम भालेकर, महादेव सोनवणे, रामभाऊ बोयणे, सतीष खंडागळे, बब्रुवान जगताप, बालाजी गायकवाड, महिला अध्यक्ष अरुणा मोरे, शांताबाई धावारे, सुनीता कांबळे, इंदुबाई बनसोडे आदी सहभागी झाले होते.
Edited - Ganesh Pitekar