गणित बदलले, तर बालभारती सोडेन

सुशांत सांगवे
मंगळवार, 25 जून 2019

गणिताविषयी वाटणारी भीती दूर करणे, हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच संख्यावाचनात बदल केला. या बदलांमुळे मोबाईल क्रमांक कसा सांगायचा, एखाद्याचे आडनाव कसे उच्चारायचे, अशा प्रकारच्या अतार्किक टीका खूप झाल्या. टीकासुद्धा अभ्यासपूर्ण असाव्यात. 
- डॉ. मंगला नारळीकर, गणितज्ज्ञ

लातूर - दुसरीच्या गणितातील संख्यावाचनाचे बदल मागे घेण्याच्या हालचाली ‘बालभारती’त सुरू असल्याची माहिती कळली. खरेच हे बदल मागे घेतले, तर गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ‘बालभारती’तून बाहेर पडेन, अशी भूमिका गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी सोमवारी घेतली. समाजातील गंभीर मुद्द्यांपासून लक्ष वळविण्यासाठी गणितातील बदलांचा वापर करून घेण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकातील संख्यावाचन पद्धतीत यंदा बदल करण्यात आला आहे. हे बदल नेमके काय, हे सांगणारे ‘त्र्याहत्तरऐवजी आता सत्तर तीन’ असे वृत्त ‘सकाळ’मध्ये सर्वप्रथम १४ जूनला प्रसिद्ध झाले. त्यानंतर काही लेखकांनी या पद्धतीला विरोध दर्शविला. विधिमंडळातही यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘गरज पडल्यास तज्ज्ञांची समिती नेमून योग्य तो निर्णय घेऊ,’ असे जाहीर केले. 

या सर्व घटनांवर संवाद साधला असता डॉ. नारळीकर यांनी ही भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘गणित अधिक सोपे वाटावे म्हणून आम्ही संख्यावाचनात बदल केले. ते कित्येक शिक्षक, वाचक, अभ्यासकांना आवडले. महत्त्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही आवडले. काहींनी तर इतकी सोपी पद्धत आमच्यावेळी असती, तर आम्ही गणितात मागे राहिलो नसतो, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. याबाबत अनेक पत्रे, ई-मेल आली आहेत. ते ‘बालभारती’च्या स्वाधीन करणार आहोत. तरीही, ‘बालभारती’ गणितातील बदल मागे घेणार असेल, तर तिथून बाहेर पडेन. ‘बालभारती’ला पुढे ऐकणारा अध्यक्ष नेमता येईल. खरेतर ‘बालभारती’ने स्वत:हून माझी गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. इतरांना अर्ज करावा लागतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathematics balbharti Education mangala Naralikar