चालकांच्या मर्जीनुसार रिक्षातून अवैध वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा आणि व्हॅनमधून अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या मुलांना दाटीवाटीने कोंबून अवैध वाहतूक करणे सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोच; पण ओव्हरलोडमुळे अपघात होण्याची शक्‍यताही निर्माण होते.

औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा आणि व्हॅनमधून अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या मुलांना दाटीवाटीने कोंबून अवैध वाहतूक करणे सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोच; पण ओव्हरलोडमुळे अपघात होण्याची शक्‍यताही निर्माण होते.

मागील आठवड्यात नगर रस्त्यावर स्कूल बसची काच निखळून दोन विद्यार्थी बाहेर फेकल्याने जखमी झाले होते. स्कूल बसप्रमाणेच रिक्षा आणि व्हॅनमधून होणारी वाहतूक तर अत्यंत धोकादायक बनली आहे. नियमानुसार कॅन्व्हास हूड (कापडी छत) असलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करता येत नाही. बंद स्टील बॉडीच्या वाहनांमधूनच वाहतूक करणे आवश्‍यक आहे. तरीही शहरात राजरोसपणे रिक्षातून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक सुरू आहे. रिक्षामध्ये चालकाच्या दोन्ही बाजूंना विद्यार्थी बसविले जातात. पाठीमागेही समोरासमोर दोन सीट टाकून तिथे आठ मुले कोंबून बसविली जातात. बहुतांश रिक्षाच्या दोन्ही बाजूंना दारही नसतात. व्हॅनमध्येही तशीच अवस्था असते. अनेक चालक वाहन चालविताना नियमांचे उल्लंघन करीत सर्रास मोबाईलवर बोलत असतात. तर काही चालक शाळा भरण्याअगोदर ११ ते १२ या वेळात दोन ट्रीप पूर्ण करण्यासाठी वेगात वाहन चालवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळतात. 

परवाना रद्दच्या सूचनेकडे दुर्लक्ष 
रिक्षातून जास्त शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना ज्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते, तो रिक्षाचालक पुन्हा हा नियम मोडताना सापडल्यास त्याचा परवाना रद्द करावा, असे पत्र वाहतूक शाखेतून आरटीओला पाठविण्यात आले आहे; परंतु या पत्राला रिक्षाचालक फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. 

आरटीओकडून सातत्याने कारवाई केली जाते. चार दिवसांपूर्वी पावणेदोनशे स्कूल बसविरोधात कारवाई केली आहे. यापुढे रिक्षा व व्हॅनविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. 
- स्वप्नील माने,  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

स्कूल बससह ४२ वाहनांवर कारवाई 
औरंगाबाद - स्कूल बसमध्ये नियमावलीचे उल्लंघन, महिला काळजीवाहक नसणे याविरोधात मंगळवारी (ता. १२) आरटीओ कार्यालयातर्फे संपूर्ण शहरात व्यापक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत संपूर्ण आरटीओ अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. 

शहरातील स्कूल बसचा प्रश्‍न गेल्या काही दिवसांमध्ये गंभीर झाला आहे. नियमांचे उल्लंघन करून सर्रास स्कूलबस चालविल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात स्कूलबसची काच निखळल्याच्या अपघातानंतर आरटीओ कार्यालयाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने स्कूलबसविरोधात मोहीम सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वी पावणेदोनशे बसच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी (ता. ११) शहरातील विविध रस्त्यांवर २८ ते ३२  स्कूलबससोबतच ट्रॅक्‍टर्स, टॅंकर्स, खासगी कंपन्यांच्या बस, कॅश वाहने, ट्रॅव्हल्स आदी वाहनांवर कारवाई केल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, श्रीकृष्ण नकाते, शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तैनात करण्यात आली होती. महिला कर्मचारी वगळता आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. स्कूलबस नियमावली २०११ नुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक असणे आवश्‍यक आहे. याशिवाय सर्व नियम पाळले जातात किंवा नाही या अनुषंगाने बसची तपासणी करून कारवाई करण्यात आली. या मोहिमेत २५ पेक्षा अधिक स्कूल बस जप्त करण्यात आल्या.

विद्यार्थिनींचा जीव धोक्‍यात घालून पळविली बस
सरोश पब्लिक स्कूलची बस २० विद्यार्थिनींनी नेत असताना आरटीओ पथकाने थांबण्याचा इशारा केला असता चालक हुलकावणी देत पळ काढला. त्यानंतर पथकाने शिताफीने पाठलाग करीत त्यास ताब्यात घेतले. मुलींना शाळेत सोडून नंतर ती बस (क्र. एमएच १२ सीएच ४१६) जप्त करण्यात आली. दरम्यान, कारवाईत १३४ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. यात फिटनेस नसलेल्या जवळपास ४० बस आढळून आल्यानंतर त्या बसना जप्त करण्यात आले. तर ९७ स्कूल बसना विविध त्रुटींअंतर्गत मेमो देण्यात आले आहेत. त्यांनी आठ दिवसांत त्या पूर्तता पूर्ण केल्या नाहीत तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर अनेक स्कूल बसवर महिला काळजीवाहक नसल्यामुळे शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत.

Web Title: Maximum school students in auto rickshaw