नगराध्यक्षांची प्रकृती अस्वस्थ; आघाडीत धडधड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

बीड - जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या बीड पालिकेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी (ता. १०) बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तहकूब झाली; पण उपाध्यक्षपदासाठी समीकरण जुळलेले असतानाच सभा तहकूब झाल्याने काकू-नाना विकास आघाडीची धडधड वाढली आहे. 

बीड - जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या बीड पालिकेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी (ता. १०) बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तहकूब झाली; पण उपाध्यक्षपदासाठी समीकरण जुळलेले असतानाच सभा तहकूब झाल्याने काकू-नाना विकास आघाडीची धडधड वाढली आहे. 

अटीतटीच्या झालेल्या बीड पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी निकटचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे शेख निझाम यांचा पराभव करून विजय मिळविला; पण डॉ. क्षीरसागर यांच्या विरोधात आघाडीकडून बंधू रवींद्र क्षीरसागर यांनी शड्डू ठोकल्याने निवडणूक गाजली. दरम्यान, नगराध्यक्षपद मिळाले असले तरी उपाध्यक्षपदासाठी पुरेसे संख्याबळ राष्ट्रवादीला मिळवता आले नाही.

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १८, आघाडीचे २०, एमआयएमचे नऊ, शिवसेनेचे दोन आणि भाजप एक असे नगरसेवक विजयी झाले. दरम्यान, उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मंगळवारी (ता. १०) विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. सकाळी १० ते १२ या वेळेत उपाध्यक्षपदाचे अर्ज दाखल करण्याच्या वेळेत आघाडीकडून हेमंत क्षीरसागर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनोद मुळूक व भास्कर जाधव यांचे अर्ज दाखल झाले. प्रत्यक्ष सभा १२ वाजता सुरू होण्याच्या वेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना प्रकृती अस्वास्थामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे बैठकीच्या वेळी ते पोचू न शकल्याने सभा तहकूब करण्यात आल्याचे नगरविकास विभागाचे प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी जाहीर केले. दरम्यान, डॉ. क्षीरसागर यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. या वेळी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

उपाध्यक्षपदासाठी झाली होती आघाडीची जुळवणी
आघाडीचे २०, तर एमआयएमचे नऊ नगरसेवक विजयी झाले होते; मात्र एमआयएमच्या सात जणांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केल्यानंतर हा गट आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती. मंगळवारी विशेष बैठकीला आघाडीच्या २० नगरसेवकांसोबतच हे सात जण आल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले. एकूणच उपाध्यक्षपदासाठी बहुमताची जुळवणी आघाडीने केली होती. त्यांच्याकडून या पदासाठी हेमंत क्षीरसागर यांचा अर्ज आला होता; पण नगराध्यक्षांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभाच रद्द झाल्याने हातातोंडाशी आलेले पद आघाडीपासून दूर गेले आहे. आगामी काळात काय राजकीय खेळ्या होतात आणि त्यातही जर आघाडीच्या बाजूने पत्ते पडले तर पुन्हा त्यांना हे पद मिळेल. 

प्रशासनाचीही उडाली धांदल
जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची बैठक बोलावणे व पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना अधिकार दिले. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी यानुसार मंगळवारी सभा बोलावली; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनाच सभेला हजर राहता आले नाही. असा प्रकार प्रथमच घडल्याने पुढे काय यावरून प्रशासनाची धांदल उडाली. मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांनी हा इतिवृत्तांत पालिका प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांना कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ नगर विकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले. पीठासीन अधिकारी हजर नसल्याने सभा तहकूब करा असे कळाल्यानंतर श्री. शिवणे यांनी हा निरोप नगरसेवकांना दिला. पुढे कधी सभा बोलवायची, बोलवण्याचे अधिकार कोणाला (नगराध्यक्ष की प्रशासनाला) याबाबतही संभ्रम आहे.

सभापती क्षीरसागरांच्या विरोधात गुन्हा

बीड - एमआयएमचे पालिकेतील गटनेते शेख अमर यांच्या चालकाला मंगळवारी (ता. दहा) मारहाण करून शेख अमर यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांच्यासह इतर दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

मंगळवारी पालिका उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीच्या बैठकीसाठी एमआयएमचे गटनेते शेख अमर त्यांच्या जीपमधून (एमएच- २३, क्‍यू- १३१३) जात असताना सभापती संदीप क्षीरसागर, शेख सिद्दिकी शेख मंजूर व शेख बिलाल यांनी जिल्हा परिषदेसमोर जीप अडविली. चालकाला मारहाण केली व शेख अमर यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शेख अमर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून शहर पोलिस ठाण्यात वरील तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशा घडल्या दिवसभर घडामोडी

  • उपाध्यक्षपदासाठी आघाडीकडून हेमंत क्षीरसागर, तर राष्ट्रवादीकडून विनोद मुळूक व भास्कर जाधव अशा तीन उमेदवाऱ्या आल्या.
  • आघाडीचे २० नगरसेवक आणि एमआयएमच्या स्वतंत्र गटाचे सात असे एकूण २७ नगरसेवक एकत्र आले. 
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक सोबत आले.
  • अटीतटीची निवडणूक असल्याने पालिका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
  • प्रशासनाच्या अधिकारात सभा घ्या, शासनाकडून लवकर मार्गदर्शन मागवावे यासाठी आघाडीचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून. 
  • आघाडीचे नगरसेवक उशिरापर्यंत पालिका सभागृहात बसून होते.
  • नगराध्यक्षांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाभोवती समर्थकांची गर्दी.
  • नगराध्यक्षांना बहुमताची जुळवणी झाली नसल्याने जाणीवपूर्वक सभा तहकूब केल्याचा आघाडीचा आरोप
Web Title: mayor health footloose