महापौरांनी केली जनतेच्या पैशांची लूट; खासदार इम्तियाज यांचा आरोप

Imtiyaz-Jaleel
Imtiyaz-Jaleel

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला.

लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गुरुवारी (ता. 13) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले होते. महापौरांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर एमआयएम व युतीच्या नगरसेवकांमध्ये घमासान झाले. त्यावेळी इम्तियाज यांनी महापौरांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार शनिवारी पत्रकार परिषद घेत महापौरांनी केलेल्या उधळपट्टीचे आकडे जाहीर केले. 29 ऑक्‍टोबर 2017 पासून आतापर्यंत महापौरांनी विविध दौऱ्यांवर एक लाख 42 हजार 873 रुपयांचा, दालन व बंगल्यावर 10 लाख 42 हजार तसेच सर्वसाधारण सभेतील जेवण व साऊंड सिस्टीमवर चार लाख 19 हजार 594 रुपये एवढा खर्च करत जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. महापालिका आर्थिक संकटात आहे. जनतेला पाण्याचे टॅंकर देण्यासाठी पैसे नाहीत, विकास कामांचे बिले थांबल्यामुळे कंत्राटदार उपोषण करत आहेत, असे असताना महापालिका जहागिरी असल्यागत महापौर उधळपट्टी करत आहेत. काढलेले फोटो कुठे आहेत? याचे प्रदर्शन मांडा आम्ही बघायला येऊ, असे आव्हान इम्तियाज यांनी दिले. 

हे तर ट्रेलर, अनेक जण जेलमध्ये जातील
महापौरांची उधळपट्टी हे तर एक ट्रेलर आहे. यापेक्षा मोठे प्रकरणे महिनाभरात बाहेर काढू. अधिकारी, पदाधिकारी जेलमध्ये जातील. आता त्यांना झोपेतही इम्तियाज दिसेल असा टोला इम्तियाज यांनी लगावला. खैरे यांचा पराभव महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

घरी कधी येणार ते सांगा 
'घरात घुसून मारू' असा इशारा शिवसेनेच्या मुखपत्रातून एमआयएमला देण्यात आला आहे. त्यावर कधी येणार ते सांगा, आम्ही सत्कार करून, असे खासदार इम्तियाज म्हणाले. 

काय म्हणाले इम्तियाज?
- खैरेंना खूष करणे एवढेच महापौरांचे काम. खैरे म्हणाले तेव्हा उठणार, खैरे म्हणाले तेव्हा बसणार. 
- या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी न्यायालयात जाणार असेल तर मदत करू. 
- महापालिकेत पुन्हा युतीची सत्ता येणार नाही. 
- महापालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे उद्धव ठाकरे यांना पाठविणार. 
- ज्या दिवशी बेगमुऱ्यातील काळे धंदे उघडकीस येतील त्यावेळी अफसर खान यांचे हाल होतील. 
- गुटखा, काळ्याधंद्याच्या विरोधात आमदार अतुल सावे यांनी एकही पत्र का दिले नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com