हिंगोलीत पशुपैदास प्रक्षेत्राच्या जागेवर होणार वैद्यकीय महाविद्यालय

राजेश दारव्हेकर
Saturday, 5 December 2020

हिंगोली येथे वैद्यकिय महाविद्यालय नसल्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे .  या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालय सुरु व्हावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त केली जात होती

हिंगोली : हिंगोलीत पशुपैदास प्रक्षेत्राच्या २५ एकर जागेवर लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी होणार असून त्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. चार)  पाहणी केली. 

हिंगोली येथे वैद्यकिय महाविद्यालय नसल्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालय सुरु व्हावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त केली जात होती. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनी  पालकमंत्री वर्षा गायकवाड , वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन हिंगोलीत वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मांडली. यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री देशमुख यांनी याला होकार  दिला. त्यानंतर शुक्रवारी नांदेड येथील वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. विवेक सहस्त्रबुध्दे, डॉ. वैशाली इनामदार  यांच्या पथकाने हिंगोलीत येऊन पाहणी केली.

हेही वाचा हिंगोली : बेकायदेशीर जीवंत काडतुससह शस्त्र साठा जप्त

यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ . मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे यांची उपस्थिती होती. या पथकाने शासकिय रुग्णालयातील अंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग त्या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्ण, रुग्णालयातील यंत्रसामुग्री याची पाहणी केली. या शिवाय जागेचीही पाहणी केली. त्यानंतर या पथकाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पशुपैदास प्रक्षेत्राची २५ एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे.

या पथकाने हिंगोलीतील सविस्तर माहिती तसेच उपलब्ध जागा, शासकिय रुग्णालयातील सुविधा याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला आहे.  त्यामुळे आता लवकरच हि प्रक्रिया पुर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A medical college will be set up on the site of a livestock farm in Hingoli