शहागंजातील मीना बाजार हेच वादाचे मूळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - शहागंज ते सिटी चौक या मुख्य रस्त्यावर रमजान ईदनिमित्त भरणारा मीना बाजार हेच साऱ्या वादाचे मूळ असल्याचा आरोप स्थानिक व्यापारी आणि रहिवासी करीत आहेत. संपूर्ण रस्ता काबीज करणाऱ्या हातगाड्या व फेरीवाल्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी हा बाजार दुसरीकडे स्थलांतरित करावा, या जुन्याच मागणीचा पुनरुच्चार ‘सकाळ’शी बोलताना केला. 

औरंगाबाद - शहागंज ते सिटी चौक या मुख्य रस्त्यावर रमजान ईदनिमित्त भरणारा मीना बाजार हेच साऱ्या वादाचे मूळ असल्याचा आरोप स्थानिक व्यापारी आणि रहिवासी करीत आहेत. संपूर्ण रस्ता काबीज करणाऱ्या हातगाड्या व फेरीवाल्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी हा बाजार दुसरीकडे स्थलांतरित करावा, या जुन्याच मागणीचा पुनरुच्चार ‘सकाळ’शी बोलताना केला. 

राष्ट्रीय हिंदी विद्यालय, शहागंज, सराफा ते सिटी चौक रस्त्यावरील दुकानदार, व्यापारी आणि रहिवाशांशी ‘सकाळ’ने संवाद साधला असता, त्यांनी मीना बाजार भरण्याच्या काळात होणारे हाल कथन केले. या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून दहा वर्षे झाली. त्यासाठी अनेक मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या; मात्र मालमत्ताधारकांना अजून मोबदला देण्यात आलेला नाही. रुंद झालेला रस्ता मात्र हातगाडीचालकांनी गिळंकृत केला. रमजानच्या तोंडावर भरणाऱ्या बाजारात प्रचंड गर्दी होऊन रस्त्यालगतच्या दुकानदारांची गोची होते. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग तीन वर्षे या ठिकाणी परवानगी नाकारत  बाजार आमखास मैदानावर हलविला होता. पार्किंग आणि दुकानांसमोर हातगाड्या उभ्या करण्यावरून व्यापारी व हातगाडीवाल्यांचे वाद होतात. हा भाग ‘नो हॉकर्स झोन’ असताना त्याचे उल्लंघन करून मीना बाजार भरविल्याने वीस दिवस रस्ता बंद राहतो. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होते, असा आरोप या भागातील हिंदू आणि मुस्लिम व्यापारीदेखील करीत आहेत; मात्र नावानिशी बोलण्यास कुणीही तयार होत नाही.

स्कूल बस, रुग्णवाहिका येतच नाही
राजाबाजार, धावणी मोहल्ला या भागातील रहिवाशांच्या अडचणी वेगळ्याच आहेत. मीना बाजारच्या काळात मुलांच्या स्कूल बस सराफ्यात येतच नाहीत. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमनच्या गाड्यासुद्धा पोचू शकत नाहीत. गेल्यावर्षी घरातील आजारी पडलेल्या वृद्धाला स्ट्रेचरवरून दूरवर मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागल्याचे एका गृहिणीने सांगितले. 

दारापुढेच करतात घाण
छोट्या स्थानिक विक्रेत्यांना मीना बाजारात बसूही दिले जात नाही. कानपूर, आझमगढ, लखनौकडून येणाऱ्या फेरीवाल्यांकडून हप्ते घेऊन स्थानिक पुढारी त्यांना घुसवतात. ते सगळा रस्ता काबीज करून पथाऱ्या पसरतात, असे येथील प्रत्येक दुकानदार सांगतो. रस्त्यांलगतच्या गल्ल्यांमध्येच हातगाडीचालक घाण करतात. कित्येकदा त्यांनी घराच्या दारापुढेच उरकलेले प्रातर्विधी नागरिकांना स्वच्छ करावे लागले आहेत. अडवायला गेले तर मारहाण, शिवीगाळ होते. घाण आणि कचरा उचलायला महापालिकेचे कर्मचारी फिरकतच नाही, असे सराफ्यातील महिलांनी सांगितले.

आता हा त्रास पुन्हा नको
सुरवातीच्या काळात येथील काही दुकानदारच भाडे आकारून फेरीवाल्यांना ओसरीत, ओट्यावर जागा देत. वीस दिवसांच्या काळाचे १० हजारांपर्यंत भाडे आकारले जाई; पण दोन वर्षांपासून तक्रारी वाढल्याने व्यापारी जागा देईनासे झाले; परंतु अरेरावीने पथाऱ्या पसरून दुकाने थाटली जाऊ लागली आहेत. दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा काही नवा वाद होऊन नुकसान होऊ नये, या भीतीपोटी बाजारतळ हलविण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Meena Bazar in Shahaganj is the origin of the aurangabad issue