एअर कनेक्‍टिव्हिटीसाठी दिल्लीत बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाची क्षमता असतानाही येथून विमानसेवेला उतरती कळा लागली. मात्र, औरंगाबादला नव्या उड्डाणांची सोय करण्यासाठी नागरी उड्डयण मंत्रालयाने राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी (ता. २८) बैठक घेतली. 

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाची क्षमता असतानाही येथून विमानसेवेला उतरती कळा लागली. मात्र, औरंगाबादला नव्या उड्डाणांची सोय करण्यासाठी नागरी उड्डयण मंत्रालयाने राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी (ता. २८) बैठक घेतली. 

औरंगाबादला दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या विमानांची सेवा सध्या सुरू आहे. मात्र औरंगाबादेतून नव्या शहरांसाठीची जोडणी मिळण्याऐवजी सुरू असलेल्या विमानांची संख्या कमी होत चालली आहे. दोन विमाने कमी झाल्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या हालअपेष्टा कायम आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी उद्योजक, राजकारणी आणि अन्य क्षेत्रांतील मंडळींनी नागरी उड्डयण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. जेट एअरवेजचे विमान बंद झाल्याने दिल्ली आणि मुंबई येथे रिकामा असलेला स्लॉट वापरून नवीन विमानसेवा औरंगाबादेतून सुरू करण्याची मागणी पुढे आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत औरंगाबादेतील कनेक्‍टिव्हिटी वाढविण्यासाठी नागरी उड्डयण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पधी यांनी दिल्लीत मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्याला अनेक विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. औरंगाबादला नव्या विमानांची जोडणी करण्यासाठी या बैठकीत खल करण्यात आला. याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उषा पधी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

राजस्थान, बंगळुरू, बुद्धिस्ट सर्किट
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा जयपूर शहराशी हवाई संपर्क असावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामाध्यमातून पूर्वी बंद झालेली सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याशिवाय कर्नाटकाची राजधानी बंगळुरू, बुद्धिस्ट सर्किटचा भाग असलेले गया या शहरांशी ‘उड्डाण’ योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहराची हवाई जोडणी करावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting for air connectivity in Delhi