आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या शेतात झाली खरीप हंगामपूर्व बैठक

विकास गाढवे
मंगळवार, 7 मे 2019

जिल्हाधिकारी म्हणाले..
​- व्यापार न करता शेतकऱ्याचे मित्र बना
- व्यवसायात तारतम्य ठेवा
- जास्त कमीशन म्हणजेच संशयाला बळ
- कमीशनपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या
- दर्जेदार बी बियाणे व खतांची विक्री करा
- नफा कमवण्यापेक्षा पुण्य कमवा
- शेतकरी जगला तर तुम्ही जगाल

लातूर : कर्जाचा डोंगर व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या खानापूर (ता. रेणापूर)  येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता. सात) जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक घेतली. शेतकऱ्यांवरच तुमचा व्यवसाय अवलंबून असून तो जगला तरच तुम्ही जगाल, असे स्पष्ट करत `बिझनेस` न करता `कन्सलटंट` (सल्लागार) होऊन शेतकऱ्यांचे मित्र म्हणून काम करा, अशी साद श्रीकांत यांनी खत व बी बियाणे विक्रेत्यांना घातली.

खानापूर येथील शेतकरी शेख जाफर पाशूुमिया यांनी १५ डिसेंबर २०१४ रोजी आंब्याच्या बागेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कर्जबाजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले. शेख यांच्यासह अनेक शेतकरी आत्महत्या करत असून त्याचे मुळ कारण शेतात काहिच पिकत नाही. याला बऱ्याच अंशी खते तसेच बी बियाणांचा दर्जा कारणीभूत असल्याचे श्रीकांत यांना लक्षात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी ते राबवत असलेल्या मिशन दिलासा उपक्रमातून त्यांना ही बाब प्रकर्षाने जाणवली. यामुळेच त्यांनी शेती उत्पन्नाशी निगडीत खते, बी बियाणे व किटकनाशक विक्रेत्यांची (कै.) शेख यांच्या शेतात पहिली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक घेतली. सकाळी आठ वाजता आयोजित या बैठकीला जिल्ह्यातून विक्रेते तसेच कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रेत्यांनी शेतकऱ्यांप्रती सकारात्मक व आपलेपणाची भावना ठेवली तरी आत्महत्या होणार नाही, असेही श्रीकांत यांनी सांगितले. श्रीकांत यांनी (कै.) शेख यांच्या शेतातीत विहिरीची पाहणी करण्यासोबत त्यांच्या आत्महत्यामागील कारणे जाणून घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प संचालक दिनकर जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले..
- व्यापार न करता शेतकऱ्याचे मित्र बना
- व्यवसायात तारतम्य ठेवा
- जास्त कमीशन म्हणजेच संशयाला बळ
- कमीशनपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या
- दर्जेदार बी बियाणे व खतांची विक्री करा
- नफा कमवण्यापेक्षा पुण्य कमवा
- शेतकरी जगला तर तुम्ही जगाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meeting with collector in farm at Latur