नाराजी दूर करण्यासाठी भेटीगाठींवर भाजपचा भर 

प्रकाश बनकर
Sunday, 15 November 2020

पदवीधरसाठी पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर करण्याचाही प्रयत्न 

औरंगाबाद : भाजपतर्फे पदवीधरसाठी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याच निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरु करण्यात आला आहे. यासाठी नाराजांच्या भेटीवर सध्या भर दिला जात आहे. यासह अंतर्गत गटबाजीही कमी करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. यात संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्यासह पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
भाजपच्या ताब्यात असलेली पदवीधर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत परत आणण्यासाठी केंद्रीय पातळीवरूनच प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी नाराज असलेल्यांच्या भेटी घेत त्यांची नाराजी दुर करण्याचाही प्रयत्न केला जात आहेत. पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांची आज पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेत, निवडणूकीसाठी साथ असू द्या अशी गळ घालण्यात आली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यासह पदवीधरासाठी नाराज असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय किशोर शितोळे यांचीही उमेदवार शिरिष बोराळकर आणि भाऊराव देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेत समजूत काढत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्ता मेळाव्याच्या दिवशी मेळाव्यापूर्वी प्रविण घुगे यांच्या निवासस्थानी जात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, निलंगेकर, आमदार हरिभाऊ बागडे यांनी भेट घेत समजूत काढली होती. यासह बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचाही समजूत काढण्यात येत आहेत. यासाठी पंकजा मुंडे पुढाकार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच नाराज असलेल्यांना मनवत त्यांना कामाला लावण्याचे काम भाजपतर्फे केले जात आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जयसिंगराव यांच्याकडे दुर्लक्ष 
पदवीधर मतदारसंघासाठी दोन टर्म काढलेले आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेले जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हापासूनच त्यांच्याकडे पक्षातर्फे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. तापडिया नाट्य मंदिरात झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना स्टेजवर जागा देण्यात आली नाही. यासह कार्यक्रमात सर्वाचे नामोल्लेख घेत असताना जयसिंगराव गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  जयसिंगराव गायकवाड यांच्याकडे पक्षातर्फेच दुर्लक्ष करण्यात येत आहे. नाराजांच्या गटात जयसिंगराव गायकवाड यांचे नाव असताना त्यांची समजूत काढण्यासाठी अद्यापही कोणीच गेले नाही. एवढेच नव्हेतर त्यांना साधा संपर्कही साधण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meetings in BJP to remove resentment