औरंगाबाद जिल्हा परिषदेत लवकरच मेगा भरती 

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

औरंगाबाद - राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या मेगा भरतीदरम्यान औरंगाबाद जिल्हा परिषदेतही लवकरच 350 रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत. कोणती व किती पदे रिक्‍त आहेत याविषयीची माहिती संकलित करून सरकारला प्रशासनाने सादर केली आहे. त्यानुसार 350 रिक्‍त पदे भरण्यास मान्यता मिळाली असून, लवकरच पदभरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना निघण्याची शक्‍यता आहे. 

राज्य सरकारकडून विविध विभागांत मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध खात्यांच्या नोकरभरतीच्या जाहिराती येत आहेत. रिक्‍त पदे पाहून आजपर्यंत नोकरीच्या अपेक्षेने असलेल्या बेरोजगार नोकरीचे अर्ज भरण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. येथील जिल्हा परिषदेत रिक्‍त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने पद व रिक्‍त जागांची माहिती संकलित करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला चार महिन्यांपूर्वीच दिले होते. रिक्‍त पदांची बिंदू नामावलीनिहाय माहिती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार वर्ग तीनच्या 18 पदांच्या सुमारे 350 जागांसाठी लवकरच भरती केली जाणार आहे; मात्र अद्याप भरती प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबविली जाईल, जिल्हा निवड समितीमार्फत केली जाईल, की राज्यस्तरावर केंद्रीय पद्धतीने होईल, याबाबत कोणत्याच सूचना आलेल्या नाही. त्यामुळे आता केवळ निर्देशांची वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

खबरदारीचे बॅनर 
भरती प्रक्रियेची अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही किंवा अधिकृत प्रक्रिया सुरू झालेली नाही; मात्र तरीही भरती करून देतो म्हणत खेड्यापाड्यांतून नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची लुबाडणूक करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. नुकतेच सिल्लोडमध्ये आरोग्यसेवक पदावर लावून देतो म्हणत एकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्हा परिषद मुख्यालयात असे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध राहण्याचे बॅनर लावले आहेत. याविषयी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी सांगितले, की प्रशासनाकडे असे फसवले गेल्याची तक्रार आली नाही; मात्र अशी कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com